spot_img
spot_img
spot_img

लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे, तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणे हे राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेला फिनिक्स पुरस्कार स्वीकारताना ते मुंबईत बोलत होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, एबीपी माझा चॅनेलच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, सकाळ माध्यम समूहाचे संपादक निलेश खरे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, पुढारीचे संपादक विवेक गिरधारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर राज्यकर्त्यांनी टीकेला घाबरता कामा नये. टीकेसोबत सत्याची दुसरी बाजूही पत्रकारांनी निडरपणे मांडली पाहिजे.”

“पत्रकारितेमुळे राज्यकर्त्यांना दिशादर्शन मिळते. म्हणूनच पत्रकारांना आधार देणे हे कोणत्याही सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे.”

“विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली आणि भरारी घेता आली.”

“हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे कारण तो माझ्या कामगिरीपेक्षा लोकांच्या विश्वासाचा सन्मान आहे.”

श्री श्री रविशंकर यांचे मत

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री श्री रविशंकर म्हणाले, “टीका आणि प्रशंसेचा समतोल साधणारा माणूसच जगाच्या कौतुकास पात्र ठरतो. देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार देऊन मराठी पत्रकार संघाने योग्य व्यक्तीची निवड केली आहे. परंतु पुढील वर्षी हा पुरस्कार देताना पत्रकार संघाचा कस लागणार आहे, कारण फडणवीस यांना सन्मान देऊन त्यांनीच एक उच्च मापदंड निर्माण केला आहे.”

कार्यक्रमातील इतर ठळक मुद्दे

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक करून पत्रकार संघाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेष व्हिडिओ बुकचे प्रकाशन झाले. विविध मान्यवरांचे मनोगतही व्हिडिओ संदेशाद्वारे प्रदर्शित करण्यात आले.

जलपूजनाने कार्यक्रमाची सुरूवात

देशातील प्रमुख ११ नद्यांच्या पाण्यांनी भरलेल्या जलकुंभांचे श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पूजन करून नदी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

मराठी पत्रकार संघाचे संघटक संदीप पारोळेकर, सचिव हरीभाऊ प्रक्षाळे, विवेक इनामदार, डॉ. शिबू नायर, अनिल माने, पंकज बिबवे यांच्यासह पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!