शबनम न्यूज | प्रतिनिधी
ढोल-ताशांच्या गजरात आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या जल्लोषात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
बुधवारी (ता. २७) रोजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठापनेनंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करण्यासोबतच आपल्या मधुर आवाजात गायलेल्या गाण्यांना व नाटकांना प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्याच पारंपारिक ‘शिवराय’ या ढोलपथकाच्या आकर्षक वादनाने विसर्जन मिरवणुकीला इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रांगणातून सुरुवात झाली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांतील प्राध्यापक उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर काही क्षणांत चित्र रेखाटून आपल्या कलेची चुणूक दाखवली. मनसोक्त गुलालाची उधळण करत विद्यार्थ्यांनी अखेर सायंकाळी विद्यापीठातील विसर्जन घाटावर भावूक होऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.