शबनम न्यूज | प्रतिनिधी
यंदा ४७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या चिंचवडगावातील गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या दशभुजालक्ष्मी गणेशोत्सवातील ‘राजे तुम्ही असता तर…’ या जिवंत देखाव्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ गेली शेहेचाळीस वर्षे सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे सादर करून समाजप्रबोधन करीत आहे. यावर्षी मंडळाने समाज प्रबोधनात्मक ‘राजे तुम्ही असता तर…’ या जिवंत देखाव्यातून समाजातील सद्य:स्थितीवर मार्मिक भाष्य केले आहे.
सध्या राज्यात त्रिसूत्री भाषावाद आणि त्यावरून केले जाणारे राजकारण, सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सवंग प्रसिद्धीच्या नादात वाहवत जाऊन जीव गमावणारी युवा पिढी, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची दारुण अवस्था अशा विविध ज्वलंत प्रश्नांवर छत्रपती शिवाजीमहाराज भाष्य करीत त्यावर उपाय सांगताना दाखविले आहेत. कला उन्नती सामाजिक संस्था, चिखली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील एकूण दहा विद्यार्थी कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयातून साकार झालेल्या या प्रभावी देखाव्याची संकल्पना गांधीपेठ तालीम मित्रमंडळ (दशभुजालक्ष्मी गणेश) यांची आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी शुक्रवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी दिली. याप्रसंगी चिंचवड पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर, पुणे जिल्हा शिवसेना (शिंदेगट) प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते इम्रान पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगणेशाची आरती संपन्न झाली. गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, संस्थापक सदस्य भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष ॲड. विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे आणि गोपी बाफना यांनी मान्यवरांचे स्वागत केले.