पुणे: पुण्यामध्ये एकीकडे गणेशोत्सवामुळे भक्तीमय वातावरण आहे. अशात गँगवारचा भडका उडाला आहे. मागील वर्षभरापासून दबा धरून बसलेल्या वनराज आंदेकरच्या टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा खून केला आहे. गोळ्या झाडून गोविंदची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वनराजच्या हत्येचा हा बदला घेतल्याचं बोललं जात आहे.
वर्षभरापूर्वीच वनराज आंदेकर यांची सप्टेंबर २०२४ मध्ये नाना पेठेत हत्या करण्यात आली होती. वनराज आंदेकर हे 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते.
नाना पेठेतील हमाल तालीमजवळ एका इमारतीच्या पार्किंगमध्ये गाेविंद याच्यावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडण्यात आला. त्यात तो मृत्युमुखी पडला. वर्चस्ववादातून गेल्यावर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिरुद्ध दूधभाते, वनराज आंदकर यांची बहीण संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती.