शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई- रिक्षा” योजना सुरू करण्यात आलेली आहे.
पिंक ई रिक्षा या योजनेमुळे महिलांना रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासोबतच त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना लाभाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बँकेकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यशासन २० टक्के आर्थिक भार उचलणार असून लाभार्थी महिलांवर १० टक्के आर्थिक भार असणार आहे. या योजनेकरिता पात्र महिलांना रिक्षा परवाना मिळविण्यासाठी शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ २० ते ५० वयोगटातील ३ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसलेल्या महिलांना होणार आहे.
पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पंडीत जवाहरलाल नेहरु उदयोग केंद्र परीसर, गोल्फ क्लब रोड, डॉ. आंबेडकर चौकाजवळ, येरवडा, पुणे येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.