पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल आदी जलस्त्रोतामधील तरंगत्या किंवा अर्धवट तरंगत्या तसेच संकलित केलेल्या मुर्त्यांचे छायाचित्रण करून धार्मिक भावना दुखावतील व सार्वजनिक शांतता भंग पावेल अशी छायाचित्रे अथवा चलचित्रे समाजमाध्यमांवर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा मनाई आदेश पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर व कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी काढला आहे. विसर्जनानंतर गणेश मुर्तींचे छायाचित्रण, त्यांचे प्रकाशन व प्रसारण यावर बंदी घालण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.
हा आदेश दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये अंमलात राहील.
सदर आदेश सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत असून स्थानिक वृत्तपत्रांद्वारेही प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.