“प्रत्येक परिस्थितीनुसार योग्य आणि अयोग्य बदलतं. दर प्रसंगाप्रमाणे विवेक हा वेगळा असतो. म्हणून विचाराची पुढची पायरी ही विवेक आहे. म्हणूनच हा विवेक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या जबाबदारीची धुरा आपल्या हाती आहे.”असं प्रतिपादन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘वन्हि तो चेतवावा’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात विदुषी धनश्री लेले यांनी केलं.
इन्फिनिटी रेडिओवरून वर्षभर प्रसारित झालेल्या ‘वन्हि तो चेतवावा’ या मालिकेच्या ‘अध्याय पब्लिशिंग हाउस’ प्रकाशित ग्रंथरूपाचं प्रकाशन लेले यांच्या हस्ते झालं त्यावेळी आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या.
प्रसन्न वेळ, स्फूर्तिगीतांनी भारलेलं वातावरण, आसमंतातला सोनचाफ्याचा दरवळ, क्रांतिकारकांच्या वेशात आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच सभागृहात आणि व्यासपीठावर उपस्थित विविध क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्वं अश्या थाटात ‘वन्हि तो चेतवावा’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या समारंभास पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रकाशक श्री. अनिल आठलेकर, सज्जनगड संस्थानचे श्री अजेयबुवा रामदासी, समर्थ भारत अभियानाचे डॉ. राजीव नगरकर, ज्ञानप्रबोधिनी च्या सौ. शीतल कापशीकर, पीसीइटी मीडिया अँड ब्रँडिंग डिपार्टमेंट हेड डॉ. केतन देसले आणि इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
संस्कृत, मराठी व हिंदी भाषेतील भारताच्या ५२ गौरवगीतांचं संकलन आणि त्यांचं श्री. चारुदत्त आफळे, श्रीगोविंददेवगरी महाराज, कै. स्वर्णलता भिशीकर, श्री. विश्वासबुवा कुलकर्णी, डॉ. मुक्ता गरसोळे, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, राहुल सोलापूरकर या व अश्या १८ विद्वानांनी केलेलं विवेचन असं या ग्रंथाचं स्वरूप आहे.
ग्रंथनिर्मितीच्या प्रकियेत सहभागी झालेले वक्ते, लिप्यंतरणकार, संपादक आदींचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पीसीसीओइ आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या या उपक्रमास आणि संग्राह्य मूल्य असणाऱ्या या ग्रंथास पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्तमंडळ श्री. ज्ञानेश्वर लांडगे, श्रीमती पद्माताई भोसले, श्री. विठ्ठल काळभोर, श्री. शांताराम गराडे, श्री. हर्षवर्धन पाटील, श्री. नरेंद्र लांडगे, श्री. अजिंक्य काळभोर, डॉ. गिरीश देसाई, डॉ. हरीश तिवारी तसंच उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त व भरभरून शुभेच्छा दिल्या.