पीसीईटी शैक्षणिक संकुलात नवव्या ‘आयसीसीयुबीईए – २५’ आणि चौथ्या ‘आयमेस-२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पिंपरी पुणे – दहा पंधरा वर्षांत भारताने विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने विकास केला आहे. नवकल्पना, निर्मिती, उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन मायक्रो इलेक्ट्रॉनिक पॅकिंग इनोव्हेशन्सचे पुरस्कर्ते प्रा. राव तुमाला यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील शैक्षणिक संकुलातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे नवव्या ‘आयसीसीयुबीईए-२५’ आणि चौथ्या ‘आयमेस-२५’ या दोन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. ही परिषद दोन दिवसांची असून ‘संगणन, संप्रेषण, नियंत्रण आणि ऑटोमेशन’ तसेच ‘यांत्रिक अभियांत्रिकी मधील नवकल्पना’ या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सादरीकरण, चर्चा होणार आहे.
याप्रसंगी प्रा. तुमाला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आयईईईचे पुणे विभागीय प्रमुख डॉ. अमर बुचडे, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, ‘आयसीसीयुबीईए-२५’ जनरल चेअर डॉ. जयश्री कट्टी, ‘आयमेस-२५’जनरल चेअर डॉ. नरेंद्र देवरे आदी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजाला चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नवकल्पना, संशोधनाला चालना मिळावी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संवाद साधला पाहिजे, या हेतूने आयईईई काम करत आहे. पीसीसीओई मध्ये आज होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संगणन, संप्रेषण, ऑटोमेशन तसेच यांत्रिक अभियांत्रिकी’चे विषय निवडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यात याचा मोठा फायदा होईल, असे मत डॉ. अमर बुचडे यांनी व्यक्त केले.
या परिषदेसाठी देशासह सोळा देशांमधून बाराशे चाळीस प्रवेशिका आल्या. त्यामधून २१४ शोध निबंधांची निवड करून त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे, असे डॉ. जयश्री कट्टी यांनी सांगितले.
‘आयमेस’ साठी २६० प्रवेशिकां मधून १२० शोध निबंधांची निवड करण्यात आली, असे डॉ. नरेंद्र देवरे यांनी सांगितले.
डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, की संशोधकांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी; तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांशी ओळख होण्यासाठी ही परिषद उपयुक्त आहे.
यावेळी परिषदे विषयी माहिती असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.या परिषदेसाठी विविध देशांतील प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अंजली श्रीवास्तव, डॉ. संदीप पाटील यांनी केले. आभार डॉ. स्वाती जगताप यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करून परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.