spot_img
spot_img
spot_img

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी!

 १७२ शिक्षकांना निवड श्रेणी, ७८ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि मुख्याध्यापकांना पदोन्नती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शिक्षक दिनाची पूर्व संध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी व मुख्याध्यापक पदोन्नतीचे आदेश अखेर निर्गमित केले असून, १७२ शिक्षकांना निवड श्रेणी, ७८ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि अनेक पात्र शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नतीचे आदेश दिले आहेत. आयुक्त शेखर सिंह यांच्या या  
निर्णयामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, समाजाचे भविष्य घडवणाऱ्या, आदर्श पिढी निर्माण करणाऱ्या गुरुजनांच्या पदोन्नतीचा विषय मंजूर व्हावा यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. हे शहरातील तमाम गुरुजनांना वंदन आहे, असे आमदार लांडगे म्हणाले.

महापालिका क्षेत्रातील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात होता. याच अनुषंगाने पाठपुरावा करत राज्य शासनाच्या निर्णयानुसार निवड व वरिष्ठ श्रेणीचे आदेश महापालिका आयुक्त यांच्या अधिकार क्षेत्रातच देण्यात यावेत अशी मागणी केली होती. दरम्यानच्या काळात शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने राज्यातील सर्व महानगरपालिका शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे आदेश महापालिका आयुक्त स्तरावरच देण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांच्या आदेशाने  पदोन्नती समितीच्या स्वाक्षऱ्या घेऊन शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व आदेश निर्गमित करण्यात आले.

या निर्णयामुळे शिक्षक वर्गात मोठा आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षकांच्या हक्कांची लढाई यशस्वी झाली आहे.

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या निर्णयामुळे शिक्षकांचा सन्मान अबाधित राखला गेला असून, त्यांच्या योगदानाला शासनाने मान्यता दिली आहे. भविष्यातही शिक्षकांच्या हक्कांसाठी अशीच सकारात्मक भूमिका घेतली जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पालिकांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा स्तर उंचावण्याचे काम शिक्षकांनी केलेले आहे. महापालिकेचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. शहरातील एक विद्यार्थिनी सातासमुद्रापार फेलोशिप घेऊन शिकायला जाणार आहे.हे महापालिकेचे यश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्या शिक्षकांना यथोचित सन्मान देणे आपले कर्तव्य आहे.

– महेश लांडगे,
आमदार, भाजपा, पिंपरी -चिंचवड, पुणे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!