शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्य शासनाने यावर्षी गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण केले आहे.
यामध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चौक, शगुन चौक, चंद्रमणी कॉलनी सांगवी, तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृतीस्थळ चौक या ठिकाणांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार गणेशोत्सव काळात शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सांस्कृतिक कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले असून, येथे आकर्षक सजावट व जनजागृतीमधून नागरिकांना विविध माहिती उपलब्ध करून दिली गेली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पिंपरी येथील शगुन चौक तसेच जुनी सांगवी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृतीस्थळ चौक येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ या शौर्यगाथेवर आधारित सजावट करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती चिंचवड गावातील चौकात उभारण्यात आली आहे. सांगवीतील चंद्रमणी कॉलनी चौकात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात सामाविष्ट झालेल्या महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडू येथील १ अशा १२ किल्ल्यांची माहिती देत सजावट करण्यात आली आहे. तर, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चौक येथे रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख चौकांमध्ये करण्यात आलेली ही आकर्षक सजावट आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित सुशोभीकरण पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे.
गणेशोत्सव हा सामाजिक,सांस्कृतिक परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी समाजप्रबोधनाचे माध्यम आहे.या निमित्ताने प्रत्येकजण उत्साही व आनंदीवातावरणात गणरायाची आराधना करीत असतो. राज्य महोत्सवाच्या माध्यमातून विविध ठिकाणी महापालिकेने देखावे सादर केले आहेत. त्यास पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
-शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.