spot_img
spot_img
spot_img

व्यंगचित्रकारांसाठी अभिव्यक्तीची संधी मोठी : शि. द. फडणीस

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशात आणि महाराष्ट्रात व्यंगचित्रकारांसाठी चित्रातून व्यक्त होण्यास भरपूर वाव आहे. ही परिस्थिती प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यंगचित्रकारांनी पुढे यायला हवे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले.

३७व्या पुणे फेस्टिव्हल आणि कार्टूनिस्ट कंबाइन तर्फे आयोजित व्यंगचित्रकारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन फडणीस यांच्या हस्ते बालगंधर्व कलादालन येथे झाले. यावेळी संजय मिस्त्री (मुंबई) आणि व्यंगचित्रकार चारूहास पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, शरयू फरकांडे, विवेक प्रभूकेळूसकर, शुभम शिंदे, धनराज गरड हे व्यंगचित्रकारही याप्रसंगी सहभागी झाले होते.

व्यंगचित्रकारांच्या या प्रदर्शनात महराष्ट्रातील सुमारे ५० हून अधिक व्यंगचित्रकरांनी सहभाग घेतला असून २२५ हून अधिक व्यंगचित्रे यात प्रवेशित करण्यात आली आहेत.

पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

फडणीस म्हणाले, “पुणे फेस्टिव्हलने सर्व कलांना व कलाकारांना स्थान दिले आहे. कलाकारांनीही या फेस्टिव्हलमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपली कला सादर केली आहे. मात्र कलाकारांनी आणखी नवनवीन कलात्मक प्रयोग करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”

संजय मिस्त्री म्हणाले, “कला ही जीवनातील महत्त्वाची बाब आहे. कलेची दुसरी बाजू म्हणजे व्यवहार. जो कलावंत कला आणि व्यवहार यांचा समतोल राखतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. पुणे फेस्टिव्हलने हा कलांचा महोत्सव भरवला, हे कौतुकास्पद आहे.”

कार्यक्रमात कृष्णकुमार गोयल यांनी सर्वांचे स्वागत करून पुणे फेस्टिव्हलमध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. चारुहास पंडित यांनी सूत्रसंचालन केले आणि महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांना पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले याबद्दल पुणे फेस्टिव्हलचे आभार मानले. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अॅड अभय छाजेड यांनी आभार मानले.

याप्रसंगी व्यंगचित्रकार शरयू फरकंडे आणि अमोल सावंत यांनी नाममात्र शुल्कात ऑन द स्पॉट कार्टून काढून देण्याची सोय उपलब्ध केली. त्यास प्रेक्षकांनी मोठा परतिसाद दिला. पुणे फेस्टिव्हलचे सचिन आडेकर आणि आबा जगताप यांनी व्यवस्थापन पाहिले.

हे व्यंगचित्र प्रदर्शन शुक्रवार दि. ५ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!