एज्युकेशन हब पिंपरी-चिंचवड : मोशीतील 70 एकर जागा निश्चितीचा GR प्रसिद्ध
शबनम न्यूज | प्रतिनिधी
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन-2020’ मध्ये ‘एज्युकेशन हब पिंपरी-चिंचवड’ असा संकल्प केला होता. त्यामध्ये आयआयएम आणि आयआयटी सारख्या संस्थांची केंद्र शहरात सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
‘आयआयएम’ नागपूरचे संचालक भीमराया मैत्री म्हणाले की, “पुणे हे एक प्रमुख उत्पादन व आयटी केंद्र आहे. आजच्या बदलत्या जगात कार्यकारी अधिकाऱ्यांना नव्याने कौशल्य मिळवून देणे आणि आधीच्या कौशल्यांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. उद्योग आमच्याकडे येण्याऐवजी, आम्हीच त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या गरजा पूर्ण करत आहोत.”
सध्या आयआयएम नागपूर पुण्यात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी विकेंड एमबीए कार्यक्रम चालवते. जो मोशी कॅम्पस सुरू झाल्यावर तिथे स्थलांतरित केला जाईल. संस्थेचे गोवा, हैदराबाद आणि दक्षिण आशियाई देशांमध्येही विस्तार करण्याचे नियोजन आहे. पुण्यातील नव्या कॅम्पसमध्ये एक इनक्युबेशन सेंटर असणार आहे, तसेच उद्योगातील व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेले पार्ट-टाईम आणि विकेंड अभ्यासक्रमही असतील.
पुण्यातील कॅम्पस Data Science आणि Management मध्ये एक प्रमुख कार्यक्रम सुरू करणार आहे — हा कोणत्याही आयआयएमचा मुख्य कॅम्पसच्या बाहेर सुरू होणारा पहिलाच उपक्रम असेल. “चाकण, तळेगाव, भोसरी, रांजणगाव एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी पार्क यांसारख्या औद्योगिक केंद्रांच्या जवळ असल्यामुळे मोशीची निवड करण्यात आली. आम्ही सात-आठ ठिकाणांचा विचार करून ही निवड केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानास्पद आहे. उद्योगनगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि आता एज्युकेशन हब म्हणून शहराची ओळख निर्माण होते आहे. जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, संविधान भवन व आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आणि आता आयआयएम सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शहर शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.