spot_img
spot_img
spot_img

पुणे फेस्टिव्हलमधील नारदीय कीर्तन महोत्सव उत्साहात

पुणे : ३७ व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत नारदीय कीर्तन महोत्सव महाराष्ट्र साहित्य परिषदेत बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. या वेळी कीर्तनकारांनी गणरायाच्या १४ विद्यांबरोबरच ६४ कलांचा अधिपती या रूपाचे निरूपण करत श्रोत्यांना ज्ञान, श्रद्धा आणि संस्कारांची जोड दिली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. कीर्तनकारांनी आपल्या निरूपणात सांगितले की ध्यान करणे म्हणजे फक्त ध्यानधारणा नव्हे, तर कोणतेही कार्य करताना संपूर्ण लक्ष केंद्रित करणे हेच खरे ध्यान आहे. गणपती हे विद्यांचे आणि कलांचे अधिपती असल्याने त्यांच्या ध्यानातून विद्यार्थ्यांना बुद्धी, एकाग्रता आणि यश प्राप्त होते, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

या महोत्सवात ह.भ.प. निवेदिता मेहंदळे, ह.भ.प. प्रज्ञा वाळिंबे, युवा कीर्तनकार तन्मयी मेंदळे-कुलकर्णी, ह.भ.प. धनदा गदगकर, ह.भ.प. दया कुलकर्णी, ह.भ.प.वैदेही जोशी आणि ह.भ.प. अर्चना कुबेर यांनी कीर्तन सादर केले. भगवान शंकर आणि त्रिपुरासुर युद्धाची कथा सांगताना शंकरालाही यश मिळवण्यासाठी प्रथम मंगलमूर्तीची पूजा करावी लागली, हे स्पष्ट करण्यात आले. तसेच गोसावीनंदन महाराज, समर्थ रामदास स्वामी, बल्लाळेश्वर आणि नाभी यांच्या कथा उलगडून भक्ती, नामस्मरण आणि गुरुची आवश्यकता यांवर विशेष भर देण्यात आला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा दाखला देत नामस्मरण हेच जीवनाचे खरे बळ असल्याचे सांगण्यात आले.

कीर्तनकारांच्या प्रभावी गायन-निरूपणामुळे सभागृहात भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. उपस्थित श्रोते कीर्तनातील कथांमध्ये तल्लीन झाले होते. प्रत्येक कथा आणि निरूपणानंतर टाळ्यांचा कडकडाट होऊन वातावरण अधिकच भारावून गेले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड यांनी महिला कीर्तनकारांचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई उपस्थित होते. कीर्तन महोत्सवाला तबल्यावर ओंकार जोशी आणि हार्मोनियमवर साहिल पुंडलिक यांनी साथ दिली.

भक्तिरस, ज्ञान आणि संस्कारांनी सजलेला हा कीर्तन महोत्सव भैरवीने संपन्न झाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!