सात दिवसांत जवळपास ५२ टन निर्माल्य संकलित….
पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी, नाले व तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध भागांमध्ये १०३ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कुंडांमध्ये गणेशोत्सव सुरू झाल्यापासून सात दिवसांत आज दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपास ५२ टन निर्माल्य संकलित करण्यात आले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागातून ही माहिती देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाने आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून निर्माल्य संकलनाची काटेकोर व्यवस्था केली आहे. या निर्माल्याचा कंपोस्ट व सेंद्रिय खत निर्मितीसाठी पुनर्वापर करण्यात येणार आहे. नागरिकांनी निर्माल्य थेट नदी-नाल्यांमध्ये न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कुंडांमध्ये टाकल्यामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार असून याबाबत व्यापक प्रमाणात स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी व स्वयंसेवक यांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
क्षेत्रीय कार्यालयानुसार संकलित निर्माल्य
(आकडेवारी ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत)
- अ क्षेत्रीय कार्यालय – ५.१ टन
- ब क्षेत्रीय कार्यालय – ७.९ टन
- क क्षेत्रीय कार्यालय – ४.१ टन
- ड क्षेत्रीय कार्यालय – ९.२ टन
- इ क्षेत्रीय कार्यालय – १०.९ टन
- ग क्षेत्रीय कार्यालय – १.४ टन
- फ क्षेत्रीय कार्यालय – ७.४ टन
- ह क्षेत्रीय कार्यालय – ६.१ टन
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला शहरातील नागरिक, गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्था यांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. या सहभागामुळेच शहरात पर्यावरणपूरक आणि स्वच्छतेचा आदर्श गणेशोत्सव संपन्न होत आहे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
निर्माल्य कुंडांच्या माध्यमातून शहराने पर्यावरण संवर्धनाकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद या उपक्रमाच्या यशाची पायाभरणी आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक व्यापकपणे राबवण्याचे नियोजन आहे.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका