“आजवर मी अनेक संमेलने अनुभवली, परंतु जुळ्यांचे संमेलन हा माझ्यासाठी आगळावेगळा आणि विलक्षण अनुभव आहे. या संमेलनातून संविधानिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला जात आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये जुळ्यांचे संमेलन हा अभिनव उपक्रम मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात पार पडला. या अनोख्या कार्यक्रमात १२५ हून अधिक जुळ्यांची नोंदणी झाली होती, तर ५० हून अधिक जुळ्या जोड्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. मंचावर लव कुश यांचे भव्य चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमात “जुळ्यांचा क्लब स्थापन करीत असल्याची घोषणा करण्यात आली त्यावेळी सर्वांनी टाळ्यांचा कडकडात करून प्रतिसाद दिला. बालगंधर्व रंगमंदिर पालक व प्रेक्षकांनी खाचाखच भरले होते.
कार्यक्रमाला माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. केरळमधील ‘जगाची जुळ्यांची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोडिन्ही गावाच्या सरपंच तसलीना या विशेष निमंत्रित होत्या. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, बालगंधर्व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू व बाबू नायर उपस्थित होते.
बालगंधर्व येथे रॅम्बो सर्कसचे विदूषकांनी जुळ्यांचे अनोखे स्वागत करून वातावरण रंगवले. तसेच सर्वांना आग्रहाने नाष्टा दिला. या संमेलनात जगभरातील जुळ्यांवरील माहितीपट, राम और शाम जुडवा दो कालिया अशी जुळ्यांवरील चित्रपटातील गाण्यांची चित्रफित आणि कोडीन्ही गावाची माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आल्या. या फिल्म्स माध्यम समितीच्या श्रुती तिवारी, मधुरा नातू वर्धे, सागर बाबर, रोहिणी अद्वैत तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी केल्या होत्या. २ सप्टेंबर रोजी वाढदिवस असणाऱ्या जुळ्या बहिणी पुष्पा देसाई आणि स्नेहलता आठलेकर यांचा विशेष सत्कार पुणे फेस्टिव्हल तर्फे साडी व पेढे देऊन करण्यात आला. जुळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पद्मजा जोशी आणि तनुजा जावडेकर या हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या बहिणींनी मनोगत व्यक्त करताना अनेक गमतीशीर आठवणी सांगितल्या.या संमेलनासाठी आलेली अनेक लहान जुळी मुलं विदुशकांसमवेत मनसोक्त खेळली. या विदुशकांसमवेत पालकांनी जुळ्यांचे फोटो काढून घेतले तसेच मोठ्या जुळ्या भावंडांनी देखील विदुशकांसमवेत फोटो काढण्याचा आनंद लुटला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना कोडिन्ही गावाच्या सरपंच तसलीना म्हणाल्या, “केरळमधील कोडिन्ही गाव जगभरात जुळ्या जन्मांसाठी प्रसिद्ध आहे. यामागील वैज्ञानिक कारण आजवर स्पष्ट झालेले नाही. १९४९ मध्ये पहिला जुळा जन्म नोंदवला गेला, त्यानंतर यावर अनेक संशोधन झाले, मात्र ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत.”
अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, “जगभरात पुणे फेस्टिव्हलने वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक घटकाला आपलंसं करणारे आणि जनजागृती वाढवणारे हे फेस्टिव्हल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.”
वैद्यकीय व ज्योतिषीय अंगानेही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. अरुण गद्रे यांनी “जुळी होण्याची वैद्यकीय कारणमीमांसा”, डॉ. मिलिंद दुगड यांनी “जुळ्यांच्या संगोपनात घ्यावयाची काळजी” आणि ज्योतिषतज्ज्ञ आभा करंदीकर यांनी “जुळ्यांचे भविष्य वेगळे का?” या विषयांवर आपले विचार मांडले.
डॉ. गद्रे यांनी जुळ्या गर्भधारणेत वाढलेल्या ताणतणावाविषयी पालकांना जागरूक केले ते म्हणाले की जुळ्यांच्या बाळंतपणाच्या काळात रक्तदाब व मधुमेह यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते असे सांगितले, डॉ. दुगड यांनी “गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून नियमित तपासणी आवश्यक असून जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे,” असे सांगितले. ते म्हणाले की मुलं मुलींची लग्नाची वय वाढत आहेत तसेच प्लानिंग मुले बलाचा जन्म देखील लांबवली जात आहे हे योग्य नाही. ज्योतिषा आभा करंदीकर यांनी जुळ्या मुलांचे भविष्य आणि त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर भाष्य करताना ज्योतिष शास्त्राच्या मर्यादा अधोरेखित केल्या.
या कार्यक्रमाची संकल्पना पुणे फेस्टिव्हलचे माध्यम समन्वयक प्रवीण प्र. वाळिंबे यांची होती. केरळच्या कोडिन्हीच्या सरपंच श्रीमती तसलीना आणि थबशीर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पुणे फेस्टिव्हल व माध्यम समितीचा विशेष गोरव केला. प्रवीण प्र वाळिंबे यांनी प्रास्ताविकात पुणे फेस्टिव्हलच्या ३७ वर्षांच्या परंपरेचा आढावा घेतला. सूत्रसंचालन नीलिमा बोरवणकर यांनी केले, तर श्रुती तिवारी यांनी आभार मानले. श्रीकांत कांबळे व अतुल गोंजारी यांनी व्यवस्थापन पाहिले.
प्रवीण प्र. वाळिंबे