महापालिका, एनएचआयच्या अधिकाऱ्यांसह रस्त्याची पाहणी
साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील किवळे समीर लॉन्स, ताथवडे, पुनावळे चौक, वाकड, भूमकर वस्ती या रस्त्याची मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत 8.3 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची (उन्नत मार्ग) निर्मिती करण्यात येणार आहे. या साडेपाच हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला महिन्याभरात मान्यता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून मुंबई-बंगळुरू महामार्ग जातो. वाकड भूमकर चौक, ताथवडे व पुनावळेतील अंडरपास, किवळेतील मुकाई चौक आणि देहूरोड येथील सेंट्रल चौकात अनेकदा वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर’ मार्ग उभारण्यात येणार आहे. खासदार बारणे यांनी देहूरोड बाय पास जंक्शन ते वाकड चौक सेवा रस्त्याची पाहणी केली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता देवण्णा गट्टूवार, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे, सहायक संचालक नगररचना संदेश खडतरे, शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, युवासेना मावळ लोकसभा प्रमुख राजेंद्र तरस उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी देहूरोड वाय जंक्शन ते किवळे समीर लॉन्स, ताथवडे, पूनावळे चौक, वाकड, भूमकर चौकात जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारीं आहेत. ते खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश खासदार बारणे यांनी दिले.
खासदार बारणे म्हणाले, महामार्गाच्या दोन्ही बाजूला एनएचआय 12 मीटर सेवा रस्ता विकसित करणार आहे. जागेचे भूसंपादन झाले आहे. काही ठिकाणी महापालिकेच्या स्ट्रॉम वॉटरचे आउटलेट रस्त्यावर जात आहेत. त्यामुळेही खड्ड्यात भर पडली आहे. त्यामुळे आउटलेट तत्काळ वळवावे. उड्डाणपूल करण्यासाठी देहूरोड वाय जंक्शनचा भाग एनएचआयला हस्तांतरित करण्याबाबत एमएसआरडीसीला निर्देश दिले आहेत. सेवा रस्त्यावरील अंडरपासची रुंदी वाढवावी. कर्व्ह व्यवस्थित काढून द्यावेत. आराखडा तयार करून काम करावे. नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये, अशा सूचनाही खासदार बारणे यांनी दिल्या.
किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत 8.3 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) किवळे मुकाई चौक, पुनावळे, ताथवडे, वाकड येथील भूमकर व भुजबळ चौकातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत 8.3 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची (उन्नत मार्ग) निर्मिती करण्यात येणार आहे. हा ‘कॉरिडॉर’ केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केला जात आहे. साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ला महिन्याभरात केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.
एलिव्हेटेड कॉरिडॉर बालेवाडीपर्यंत जाणार आहे. पुनावळे, ताथवडे,हिंजवडीतून कॉरिडॉर जाणार आहे. या भविष्यात वाहतूक कोंडी होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये यानुसार नियोजन करावे. मार्गावरील अंडरपासची रुंदी जास्त असावी. कर्व्ह असावे. महापालिकेच्या विकास आराखड्यात जेवढे रस्ते आहेत. तेवढेच अंडरपास ठेवण्यात यावेत. – खासदार ,श्रीरंग बारणे