कलेला कोणतेही बंधन किंवा भेदभाव नसतो. कलाकार सौंदर्याची पूजा करतो. छायाचित्रकार समाजातील दुःख, वेदना आणि आनंद जनतेपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे समाजातील वास्तव पुढे आणण्यामध्ये छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आलेल्या ३ दिवसांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी बालगंधर्व कलादालनात पार पडला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शहरातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे ३०० छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली होती.
या स्पर्धेत पुढारीचे छायाचित्रकार अनंत टोले यांनी पहिले पारितोषिक पटकावले. महाराष्ट्र टाइम्सचे आशिष काळे यांना द्वितीय, तर सकाळचे प्रमोद शेलार यांना तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना प्रमाणपत्र, पुणे फेस्टिव्हलची ट्रॉफी आणि अनुक्रमे अकरा हजार, सात हजार व पाच हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते या तिन्ही छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. अंकुश काकडे, माजी महापौर प्रशांत जगताप, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सबनीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “समाजातील वास्तव छायाचित्रकारांनी अतिशय डोळसपणे टिपले आहे. पुणे फेस्टिव्हलने वृत्तपत्रातील छायाचित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे.”
प्रास्ताविकात अभय छाजेड यांनी सांगितले की, “पुणे श्रमिक पत्रकार संघाचे मोठे सहकार्य लाभले. छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच पुणेकरांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.”
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “छायाचित्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वृत्तपत्रातील छायाचित्रकारांचे हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकर आवर्जून येतात. त्यांच्या कलेचे हे कौतुक खरोखरच उल्लेखनीय आहे.”
या छायाचित्र प्रदर्शनाचे परीक्षण जेष्ठ छायाचित्रकार मिलिंद वाडेकर व सागर गोटखिंडीकर यांनी केले.