शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलावंत व निर्माते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, गायक व संगीतकार अशोक हांडे निर्मित ‘आवारा हूँ’ हा गायन, नृत्य व संगीताचा भव्य प्रयोग पुणे फेस्टिव्हलमध्ये गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.
‘आवारा हूँ’ असे चपखल नाव देण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज कपूर यांच्या चित्रपट योगदानावर निवेदन, गाणी, नृत्य आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रयोग सादर करण्यात आला. यासाठी एलईडी स्क्रीनवर राज कपूर यांच्या निवड चित्रपटांतील प्रसंग व गाणी दाखविली गेली. यामध्ये १२५ कलावंत होते. राज कपूर यांच्या कलाकृतींच्या भव्यतेप्रमाणेच या कार्यक्रमातही मोठी भव्यता प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, सौ. झेनब रमेश बागवे आणि पी एम आर डी ए चे डायरेक्टर (डेव्हलपमेंट परमिशन अँड प्लॅनिंग) अविनाश पाटील यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.