spot_img
spot_img
spot_img

संघटन, समर्पण व सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार- पंतप्रधान मोदी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नागपूर : संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार, त्यांनी काढले.

हिंगणा रोड वरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई- भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आरोग्य  क्षेत्रातील सुधारणांमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प जाहीर केला. गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आली. कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्या. एम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे. आरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू आहे.

आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले. आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे.  द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल. तसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील.

विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होते. मात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली. दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिली. माधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहे. समाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!