शबनम न्यूज | प्रतिनिधी
दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वतःवरचा आत्मविश्वास आणि कुटुंबाचे पाठबळ हेच माझ्या अविश्वसनीय यशाचे गमक आहे, असा कानमंत्र स्कायडायव्हिंग या साहसी खेळात जागतिक विक्रम केलेल्या पहिल्या भारतीय महिला पद्मश्री शीतल महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जागतिक हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त देशभर राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शीतल महाजन बोलत होत्या.
यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी देखील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडादिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शितल महाजन यांनी सांगितले की, स्कायडायव्हिंग सारख्या साहसी क्षेत्रात विक्रम करण्यासाठी माझ्या कुटुंबाने आणि मार्गदर्शकांनी पाठबळ दिले. या असाधारण ध्येयांचा पाठलाग करण्यासाठी नियमित व्यायाम करून मानसिक आणि शारीरिक क्षमता प्रथम सिद्ध केली. त्यामुळेच मला तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (२००६) आणि फेडरेशन एरोनॉटिक इंटरनॅशनल कडून एफएआय सबिहा गोकेन पदक (२०१८) मिळाले. दक्षिण आणि उत्तर या दोन्ही ध्रुवांवरून स्कायडायव्हिंग करणारी सर्वात तरुण महिला आणि ३०,५०० फूट उंचीवरून जंप करणारी पहिली भारतीय महिला असा विक्रम माझ्या नावे झाला. साहसी क्रीडा प्रकारात महिला देखील भाग घेऊन शकतात असे महाजन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. यावेळी शितल महाजन यांचा व्हिडिओ दाखविण्यात आला.
स्वागत, प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. बिंदू सैनी यांनी क्रीडादिनाचे महत्व सांगितले. मेजर ध्यानचंद यांच्या सारख्या दिग्गज खेळाडूंमुळे भारतीय हॉकी संघाने तीन वेळा सुवर्णपदक मिळवले. त्यांचा सन्मान करणे आणि मैदानी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्याचे जाहीर केले. ध्यानचंद यांचा कडून प्रेरणा घेऊन पद्मश्री शितल महाजन यांनी जागतिक विक्रम केला आहे. त्यांचा असाधारण प्रवास, धाडसी अनुभव आणि जागतिक स्तरावर साहसी लोकांना प्रेरणा देत आहे.
सूत्रसंचालन इयत्ता चौथी ची विद्यार्थिनी श्रुती कुर्हे व इयत्ता दहावीची तन्मयी पारखे यांनी केले. आभार अन्वी शेळके हिने मानले.