शबनम न्यूज | प्रतिनिधी
३७व्या पुणे फेस्टिवलमध्ये भारती विदयापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “आविष्कार भारती” कार्यक्रमातील संगीत आणि नृत्य सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त भरघोस प्रतिसाद मिळाला. संचालक प्राध्यापक शारंगधर साठे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर झाला.
भारती विदयापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी श्रुती विश्वकर्मा मराठे, नागेश आडगावकर आणि भाग्येश मराठे यांनी अभंग , गझल, नाट्यसंगीत, असे विविध प्रकार गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामध्ये जयशंकरा, युवती मना, राम रंगी रंगले मन, याद पिया की आये या गाण्यांना रसिक प्रेक्षकांनी जोरदार वन्स मोअर दिला या बरोबरच भरतनाट्यम, कथक, सत्रिय आणि मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्य शैली मधे अनेक सामूहिक नृत्य संरचना सादर झाल्या. गुरु पं. मनीषा साठे, गुरु पं. शमा भाटे, गुरु डॉ. स्वाती दैठणकर, श्रीमती स्मिता महाजन, श्रीमती अरुंधती पटवर्धन, श्रीमती अमृता परांजपे, श्रीम ती श्रीमती अस्मिता ठाकूर, श्रीमती डॉ. देविक बोरठाकू र, श्रीमती आभा औटी, श्रीमती मंजुला नांबीयार यांच्याकडे शिकणाऱ्या संस्थेच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थिनींनी ही भारदार नृत्ये सादर केली. अतिशय सुंदर ड्रेपरी, उत्तम पदन्यास आणि नृत्यातील गतिमानता यांचा नृत्यातील मिलाफ बघून सारे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी फार मोठी गर्दी केली होती. पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई,बालगंधर्व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू आदींच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.