आदिवासी कलेला ‘पुणे फेस्टिवल’मध्ये प्रोत्साहन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
वारली कला ही केवळ चित्रकला नसून आदिवासी संस्कृतीचा उत्सव आहे. साध्या पण अर्थपूर्ण आकृत्यांतून निसर्ग, सण-उत्सव आणि जीवनमूल्ये मांडणारी ही कला नव्या पिढीला रोजगार, नवनिर्मिती आणि सामाजिक विकासाचे साधन ठरत आहे. ‘पुणे फेस्टिवल’मध्ये आदिवासी कला व कलाकारांना संधी देऊन प्रोत्साहन देणे हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी काढले.
३७ व्या पुणे फेस्टिवलमध्ये रविवारी बालगंधर्व कलादालन येथे वारली पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी आदिवासी संचालनालयाच्या पुष्पलता मडावी, मुंबईच्या वारली पेंटींगच्या कलावंत उल्का देवरुखकर यावेळी उपस्थित होत्या. पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ऍड. अभय छाजेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई यांच्याहस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
या प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृतीतून आदिवासींची जीवनशैली, संस्कृती आणि परंपरा प्रभावीपणे रेखाटली आहे. वारली पेंटिंगची अडीच हजार वर्षांची परंपरा शेती, निसर्ग, सण-उत्सव आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडवते. पलघाट देवता, तारपा नृत्य, लग्न समारंभ असे विषय चित्रांतून जिवंत झाले आहेत.
अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, “देशभरात नावाजलेल्या पुणे फेस्टिवलमध्ये आदिवासी कलाकारांना व्यासपीठ देणे ही ऊर्जा देणारी बाब आहे. त्यांच्या कलांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
पुष्पलता मडावी म्हणाल्या, “सह्याद्री पर्वतरांगांतील वारली जमातीची कला आजही जगाला मोहित करते. गोंडी पेंटिंगसह या कलेला मोठी मागणी आहे. पुण्यातील या व्यासपीठामुळे आदिवासी कलाकारांना योग्य वाव मिळत आहे.”
पॉंडेचरी, मुंबई, मदुराई, अहमदाबाद, अमृतसर आदी शहरांमध्ये वारली पेंटींग प्रदर्शन आयोजित करणाऱ्या मुंबईच्या वारली पेंटींग कलावंत उल्का देवरुखकर म्हणाल्या की, ‘ पुणे सारख्या सांस्कृतिक राजधानीत वारली पेंटिंगच्या माध्यमातून आदिवासींची कला पुणेकरांसमोर दाखवता आली याचे फार मोठे समाधान आहे. पुणे फेस्टिव्हलच्या प्रोत्साहनामुळे वारली पेंटिंगच्या कलावंतांच्या आत्मनाविश्वास वाढला आहे शिवाय या प्रदर्शनास मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे मनाला मोठे समाधान मिळाले आहे. या उपक्रमाबद्दल आदिवासी कलावंतांच्या वतीने पुणे फेस्टिव्हलचे मी आभार मानते.
प्रदर्शनात वारली व गोंडी पेंटिंग केलेल्या पिशव्या, स्टोल, लिफाफे यांसह विविध हस्तकला वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कलाकारांना थेट ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळाली आहे. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
फोटो ओळ: (डावीकडून) नीता राजपूत, पुष्पलता मडावी, अॅड. अभय छाजेड, अॅड. वंदना चव्हाण, कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई, उल्का देवरुखकर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. अभय छाजेड यांनी केले. पुणे फेस्टिव्हलचे सचिन आडेकर व आबा जगताप यांनी व्यवस्थापन केले, सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले.