शबनम न्यूज | प्रतिनिधी
“पर्यटन क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी असून महाराष्ट्र या क्षेत्रात देशभरात अग्रेसर आहे. पर्यटनाला कोणतीही सीमा नसते. यासाठी विद्यार्थ्यांनी नकाशा अभ्यासला पाहिजे, भौगोलिक रचना समजून घेतली पाहिजे आणि आवडीनं काम केलं पाहिजे,” असा सूर ३७ व्या पुणे फेस्टिवलच्या परिसंवादात उमटला.
‘पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास’ या विषयावरचा हा परिसंवाद बालगंधर्व कलादालन येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य पर्यटन पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार, साहसी पर्यटन तज्ञ जितेंद्र देशमुख, गिरीकंद ट्रॅव्हल्सचे सुशील गोखले यांनी परिसंवादात सहभाग घेतला. पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ऍड. अभय छाजेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई यावेळी उपस्थित होते.
जितेंद्र देशमुख म्हणाले, “सध्या पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. महाराष्ट्रात गड-किल्ले, दऱ्या-खोऱ्या आणि अभयारण्यांची विपुलता आहे. पर्यटनात करिअर करण्यासाठी भौगोलिक माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ताडोबा अभयारण्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर, येथे तीन महिन्यांपूर्वीच बुकिंग पूर्ण होते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा सखोल अभ्यास करून, मनापासून काम केले तर निश्चित यश मिळते.”
सुशील गोखले यांनी सांगितले, “पर्यटन क्षेत्र आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांसाठी यात मोठी संधी दडलेली आहे. महाराष्ट्रात गड-किल्ल्यांचा मोठा वारसा आहे. निसर्गाशी एकरूप होत पर्यटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.”
शमा पवार म्हणाल्या, “पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर वर्षभर लाखो पर्यटक येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी विभागाकडून विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पुणे जिल्ह्यात सुमारे शंभर किलोमीटर लांबीचा निसर्गसमृद्ध मार्ग असून, तो सायकल ट्रेकसाठी उत्तम आहे. या मार्गावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्याचा पर्यटन ब्रँड विकसित करण्याची गरज आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अभय छाजेड यांनी केले. सचिन आडेकर आणि आबा जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, तर सूत्रसंचालन करुणा पाटील यांनी केले.