शबनम न्यूज | प्रतिनिधी
यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या गांधीपेठ, चिंचवडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळचा ‘चिंचवडचा राजा’ यांनी गोरक्षा संवर्धन आणि संरक्षणाचा अतिशय प्रभावी संदेश देणारा ‘जागर गोमातेचा’ हा जिवंत देखावा साकारला आहे. शाहीर आसराम कसबे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या जिवंत देखाव्यात गणेश कांबळे, शिवाजी पोळ, सार्थक कसबे, लखन जगताप, विशाल भवारी आणि स्वतः आसराम कसबे हे कलावंत हृदयाला भिडणारे संवाद व संगीतमय गीतांमधून गाईचे सर्वतोपरी महत्त्व सांगत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरजकर यांनी सांगितले की, ‘आपल्या भारतीय संस्कृतीत गाय ही केवळ पशू नसून तिला आईचा दर्जा दिला आहे. देशी गाईचे दूध हे आईच्या दुधाइतकेच मानवी शरीराला पोषक आहे म्हणूनच गाईला गोमाता म्हटले जाते. देशी गायींचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या देखाव्याची संकल्पना मांडली व लेखक, दिग्दर्शक आसराम कसबे आणि त्यांचे सहकारी कलावंत प्रभावीपणे त्याचे सादरीकरण करत आहेत. देखव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून दररोज रात्री साडेसात ते दहा या वेळेत हा देखावा सादर केला जात आहे आहे.
शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी श्रीगणराया आणि साजिवंत गोमातेचे विधिवत पूजन करून देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोईर, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर, कार्याध्यक्ष महेश मिरजकर आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.