शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत २९ ऑगस्ट २०२५ दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील ८ प्रभागांतून तब्बल ४ हजार ०३२ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरणपूरक मूर्ती ८२२ तर पीओपीच्या ३ हजार २१० मूर्तींचा समावेश आहे.
पिपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीची नोंद ठेवताना ती पीओपीची आहे की शाडू मातीची आहे, याप्रमाणे नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज संकलित होणाऱ्या मूर्तींची नोंद केली जात आहे. महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत मूर्ती संकलन मोहिमेचे निरीक्षण नियमितपणे केले जात आहे. तसेच मूर्तींचे संकलन झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची जबाबदारी देखील पार पाडली जात आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अमित पंडित, तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे, पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, महापालिकेच्या मूर्ती संकलन उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून म्हणजेच २७ ऑगस्ट २०२५ पासून ते २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर चार हजारांपेक्षा जास्त मूर्तींचे संकलन झाले आहे. तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करताना महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.