शबनम न्यूज | प्रतिनिधी
३७ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संपन्न झालेल्या उगवते तारे व इंद्रधनू कार्यक्रमात पुण्यातील २५ शाळांमधील ५०० हून अधिक बाल व युवा कलाकारांनी सहभाग घेतला. ७ वर्ष ते १४ वर्षे वयोगटातील उगवत्या बाल कलाकारांसाठी ‘उगवते तारे’ आणि १५ ते २५ वर्षे वयोगटातील युवा कलाकारांसाठी ‘इंद्रधनू’ कार्यक्रमाचे आयोजन पुणे फेस्टिव्हलमध्ये केले गेले. दरवर्षीपेक्षा यंदा अधिक मोठा प्रतिसाद लाभला. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमास बाल व युवा कलाकारां समवेत पालक शिक्षक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बाल व युवा कलाकारांनी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. भारतनाट्यम ,कथक मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्य प्रकारांबरोबरच लावणी-फ्युजन, संबळवादन , गुजराथी नृत्य,राजस्थानी नृत्य, आसामी नृत्य, फोल्क-डान्स, घुमर, देवीचा गोंधळ, देशभक्तीची गाणी, पोवाडा, जोगवा, सिने नृत्य,लोकनृत्य, आदिवासी नृत्य, गणेश वंदना, म्हैशासुर मर्दिनी स्तोत्र ,मंगळागौरीचे खेळ असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम बाल व युवा कलाकारांनी सादर केले.यामध्ये वैयाकीतिक सादरीकरण या बरोबरच समूह नृत्य देखील वाहवा मिळवून गेली टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षक त्यांना प्रोत्साहन देत होते.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, आदींनी आवर्जून येऊन बाल व युवा कलाकारांना शुभेच्छा दिल्या.वीरेंद्र किराड, बाळासाहेब दाभेकर, संजय बालगुडे आदीं. समवेतच पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले या प्रसंगी उपस्थित होते. नीता राजपूत व अॅड.सचिन हिंगणेकर यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पहिले.