महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी संकलित केलेल्या “पिंपरी चिंचवड महानगरपालिका डिजिटल प्रवास @ ३०” या पुस्तकाचे प्रकाशन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिकेत ३० वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या पोमण यांचा आयुक्त सिंह यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह सहशहर अभियंता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेल्या तीन दशकांच्या डिजिटल प्रवासाचे मोलाचे दस्तऐवजीकरण ‘डिजिटल प्रवास @ ३०’ या ग्रंथातून झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत महापालिकेला नागरिकाभिमुख बनविण्यात निळकंठ पोमण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी केवळ विभागाच्या कार्यपद्धतीत नवकल्पना आणल्या नाहीत तर माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा वारसा मागे ठेवला आहे.”
निळकंठ पोमण यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकाभिमुख कामकाज समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी निळकंठ पोमण यांनी उपस्थितांचे आभार मानताना सांगितले की, “महापालिकेच्या माध्यमातून समाजाशी थेट संवाद साधण्याची संधी ही माझ्यासाठी अभिमानास्पद ठरली. या प्रवासात मला महापालिकेतील सहकाऱ्यांचा उत्तम पाठिंबा मिळाला. येथील आठवणी अविस्मरणीय अशा आहेत.”
यावेळी “उद्योगामार्फत सामाजिक क्रांती… श्री. निळकंठ पोमण यांचा सामाजिक क्षेत्रातील प्रवास” या पुस्तकाचे देखील प्रकाशन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात पोमण यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.