शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम आदमी पक्षाने महत्त्वपूर्ण वचन दिले आहे. शहरात येत्या काळात स्टार्टअप्स आणि महापालिकेच्या माध्यमातून तब्बल २०,००० रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष रवीराज बबन काळे यांनी जाहीर केले.
रोजगार हा प्रत्येक तरुणाचा मूलभूत हक्क असून, आत्मनिर्भरतेसाठी संधी निर्माण करणे हे आम आदमी पक्षाचे प्राधान्य असल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी असून येथे युवक-युवतींना रोजगाराच्या भरपूर संधी मिळायला हव्यात. मात्र, आतापर्यंत इथल्या तरुणांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शहरातील कौशल्य, स्टार्टअप संस्कृती आणि महापालिकेच्या सहकार्याने रोजगाराचे केंद्र उभारण्यात येणार आहे.
“पिंपरी-चिंचवड शहरात २०,००० नवीन रोजगार निर्माण झाल्याने तरुण-तरुणींना स्वाभिमानाने जगण्याचा आधार मिळेल,” असे काळे यांनी सांगितले.
आम आदमी पक्षाच्या दिल्ली आणि पंजाबमधील यशस्वी शासनाचा दाखला देत, पिंपरी-चिंचवडमध्येही पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करून तरुणांसाठी नवीन दारे खुली करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.