शबनम न्यूज | प्रतिनिधी
३७ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणीचा खणखणाट आणि घुंगरांचा छनछनाट यांचा बहारदार कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी दुपारी पार पडला. दिलखेचक अदाकारी, ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावले, ठसकेबाज लावण्या आणि प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद अशा उत्साही वातावरणात सभागृहात जल्लोष रंगला.
लावणी क्वीन अर्चना जावळेकर, संगीता लाखे, अस्मिता पुणेकर, प्राची मुंबईकर, किरण पुणेकर आणि गोल्डन गर्ल नमिता पाटील यांच्या ठसकेदार नृत्यसादरीकरणाने सभागृहात उत्साहाचे तरंग उमटले.
या कार्यक्रमासाठी पुरुषांसह महिलांचीही प्रचंड गर्दी झाली. गण, गवळण, मुजरा, पारंपरिक लावण्या तसेच नवीन लावण्यांना प्रेक्षकांनी शिट्या-टाळ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून वातावरण अधिकच रंगतदार झाले.
कार्यक्रमात “बाई ग कसं करमत नाही ग”, “कुण्या गावाचं आलं पाखरू”, “कैरी पाडाची”, “चंद्रा”, “कवडसा”, “छबीदार छबी”, “ग साजणी”, “बुगडी माझी सांडली ग”, “नाकी डोळी छान” अशा एकापेक्षा एक लावण्या सादर करण्यात आल्या. यातील अनेक लावण्यांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ फड यांनी केले. वाद्यवृंदात ढोलकीवर स्वप्निल गायकवाड आणि आशिष गायकवाड, कीबोर्डवर अक्षय सकट, ॲक्टो पॅडवर सुशांत मस्के, तर गायिका स्वाती शिंदे यांनी आपल्या सुरेल आवाजाने लावणीला रंगत दिली. या कार्यक्रमाचे संयोजन शशिकांत कोठावळे यांनी केले होते.
प्रारंभी पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे फेस्टिव्हलचे काका धर्मावत, प्रसन्न गोखले यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बालगंधर्व रंगमंदिरमधील पुणे फेस्टिव्हल सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू व श्रीकांत कांबळे उपस्थित होते.