शबनम न्यूज | प्रतिनिधी
“छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. छायाचित्रांमुळे आपल्या देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. तो इतिहास जपण्याची आणि टिपण्याची मोठी जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे,” असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हल व पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे ३०० छायाचित्रे बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाल्या, “समाजमाध्यमांमुळे वृत्तपत्रातील छायाचित्रकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांची सत्यता अनेकदा कमी असते; मात्र वृत्तपत्रातील छायाचित्रकारांना एकेक छायाचित्र टिपण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. ते समाजातील भावना टिपतात. अनेक छायाचित्रे बोलकी ठरतात, हीच त्यांची खरी कला आहे. पुढील पिढी जेव्हा ही छायाचित्रे पाहील, तेव्हा तिला आपले भविष्य आणि समाजाची दिशा समजू शकेल.”
उल्हास पवार म्हणाले, “माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. हा फेस्टिव्हल आज जगभरात पोहोचला आहे. छायाचित्रांचे महत्त्व आजही तेवढेच आहे. पुणे फेस्टिव्हलने हे प्रदर्शन भरविले, हे कौतुकास्पद आहे.”
प्रा. डॉ. पराग काळकर यांनी सांगितले, “वृत्तपत्रातील छायाचित्रकार समाजमन ओळखून त्यातील भावना लोकांपर्यंत पोहोचवतात. छायाचित्रांचे प्रदर्शन होणे गरजेचे आहे.”
प्रास्ताविक पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, “पुणे फेस्टिव्हल यंदा ३७व्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदा पुणे श्रमिक पत्रकार संघ आमच्या उपक्रमात सहभागी झाला असून, त्यानिमित्ताने छायाचित्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रे यामध्ये प्रदर्शित केली आहेत. पुण्यातील संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले. तसेच व्यवस्थापन सचिन आडेकर व आबा जगताप यांनी केले.
हे छायाचित्र प्रदर्शन शनिवार, ३० ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.