‘सावित्रीची काव्यफुले’च्या अध्यक्षपदी प्रिया माळी; बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची माहिती
शबनम न्यूज | प्रतिनिधी
विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन या संस्थांच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ या महाकाव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समग्र क्रांतीकारी चळवळीच्या अभ्यासक, जेष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके, तर स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध निवेदिका कवयित्री सीमा गांधी यांची निवड झाली आहे. तसेच संमेलनामध्ये होणाऱ्या ‘सावित्रीची काव्यफुले’ या काव्यमहोत्सवाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रिया माळी यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
संगीता झिंजुरके यांच्या ‘श्रृंगार मराठीचा’ या कवितेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव झाला असून, त्यांनी पाचव्या विश्व बंधुता काव्यमहोत्सवाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. सीमा गांधी यांचा ‘मनाचे डोहाळे’ काव्यसंग्रह प्रकाशित असून ‘मी झाड व्हावे’ हा लवकरच प्रकाशित होणार आहे. प्रिया माळी यांच्या पाच साहित्यकृती प्रकाशित आहेत. संमेलनामध्ये शंभरहून अधिक महिलांचा सहभाग राहणार असून नियोजनामध्ये काषाय प्रकाशनच्या पोर्णिमा वानखेडे, बंधुता प्रकाशनच्या मंदाकिनी रोकडे आणि विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षा प्रा. भारती जाधव यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे रोकडे यांनी नमूद केले.