शबनम न्यूज | प्रतिनिधी
एका तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पोलिसाच्या डाव्या हाताला चावा घेऊन त्याला दुखापत केली आहे. ही घटना खेड तालुक्यातील खराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ शनिवारी (दि. २३) रात्री घडली.
दिपक अशोक जंगले (वय १९, रा. खराबवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मरकड यांनी रविवारी (दि. २४) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी आपत्कालीन मदत करण्याचे सरकारी काम करत असताना आरोपीने त्याच्या हातात सत्तूर घेऊन ‘तुम्ही इथे कशाला आला आहात’ असे म्हणून त्यांना धमकावले. सरकारी कामात अडथळा निर्माण करून सत्तूरसह फिर्यादीच्या अंगावर धावून येत ‘आता तुम्हाला जिवंत सोडत नाही’ असे बोलून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने पोलिसावर वार केला. मरकड यांनी वार चुकवून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने झटापट करून त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला आणि दुखापत केली.