शबनम न्यूज | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पीएचडी प्रवेशासाठी विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांमधील मार्गदर्शकांकडे (पीएचडी गाइड) उपलब्ध असलेल्या रिक्त जागांची माहिती ऑनलाइन मागविली आहे. त्यामुळे दुसरी फेरी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत.
विद्यापीठाने नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यात मार्गदर्शकांकडे (पीएचडी गाइड) उपलब्ध असलेल्या रिक्त जागांची माहिती सादर करण्यासाठी ऑगस्टअखेरपर्यंत मुदत वाढविली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने दिलेल्या माहितीनुसार संशोधन केंद्रांनी दिलेल्या मुदतीत रिक्त जागांची माहिती सादर करणे अत्यावश्यक आहे. ही माहिती सादर करताना तांत्रिक अडचणी आल्यास, संबंधितांनी प्रशासकीय भवन, पहिला मजला येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.