शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून मान्यता दिली आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळात पुण्यामध्ये देशातूनच नाही, तर जगभरातून भाविक दर्शनासाठी आणि गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी येत असतात. गणेशोत्सवानिमित्त पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा यासाठी मेट्रोने विशेष सेवा जाहीर केली आहे. त्याचा फायदा पिंपरी चिंचवडकरांना देखील होणार आहे.
३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पुणे मेट्रो सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत धावणार आहे. ही सेवा विशेष वेळापत्रकानुसार असणार आहे. पुणे मेट्रोच्या या निर्णयामुळे भाविकांना बाप्पाचे दर्शन घेणे अधिक सोयीचे होणार आहे. या वर्षी विशेष बाब म्हणजे पुणे मेट्रोची प्रवासी सेवा जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गावर सुरु झाली आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा
पेठ, मंडई व स्वारगेट ही पुण्याच्या मध्यवस्तीत असलेली स्थानके सुरु झाली आहेत. याच स्थानकांच्या सभोवताली शहरातील प्रमुख गणपती मंडळे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी टाळून थेट मंडई, कसबा पेठ या भागात पोहचता येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे.
यंदाच्या गणेश चतुर्थीपासून म्हणजे २६ २७ आणि २९ ऑगस्ट या दिवसांसाठी मेट्रोची नियमित सेवा सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात मेट्रो मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, ६ सप्टेंबरला सकाळी ६ पासून; ७ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा अखंडितपणे सुरू राहणार आहे. त्याचा फायदा पिंपरी चिंचवड शहरातील भाविकांना होणार असून पुणे याठिकाणी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे.