spot_img
spot_img
spot_img

‘कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका

७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडेच ‘कढीपत्ता’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे ‘कढीपत्ता’ चित्रपटाची नायिका कोण? या चर्चेला जणू उधाण आले आहे. रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना या चित्रपटातील नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ‘कढीपत्ता’मधील नायिकेचा चेहरा रिव्हील करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘कढीपत्ता’ चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. ‘कढीपत्ता’ची कथा विश्वा यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पदार्पणातच एक अनोखी प्रेमकथा रसिकांसमोर आणण्याचे आव्हान विश्वा यांनी स्वीकारले. नायिकेचा चेहरा न दाखवणारे पहिले पोस्टर सगळीकडे चर्चचा विषय ठरले. दुसऱ्या पोस्टरमध्ये नायिकेचा चेहरा रिव्हील करण्यात आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत भूषण पाटील असल्याचे पहिल्या पोस्टरमध्ये पाहायला मिळाले. भूषणच्या जोडीला रिद्धी कुमार मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षकांना भूषण आणि रिद्धी च्या रूपात एक नवी फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे एका नवीन जोडीची केमिस्ट्री या चित्रपटाचा युएसपी ठरणार आहे. पोस्टरमध्ये भूषण आणि रिद्धी यांनी प्रेमीयुगुलाप्रमाणे एकमेकांचा हात हाती धरलेला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर लोभासवाणे हास्य पाहायला मिळते. रिद्धी कुमारने यापूर्वी काही वेबसिरीज आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. प्रभासच्या आगामी ‘द राजासाब’मध्येही ती झळकणार आहे. याखेरीज प्रभासच्याच ‘राधे श्याम’ या चित्रपटांमध्येही तिने अभिनय केला आहे. रिद्धी कुमारचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

पहिल्याच चित्रपटात उत्कंठावर्धक कथानक असलेल्या ‘कढीपत्ता’मध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंदी असल्याची भावना रिद्धी कुमारने व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच गोष्टीला प्राधान्य देण्यात येते. या चित्रपटात भूषण आणि मी जरी नायक-नायिकेच्या रूपात तुमच्यासमोर येणार असलो तरी खरा हिरो गोष्ट आहे. या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा खूपच दमदार आहे. ही आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणारी स्वतंत्र विचारांची तरुणी आहे. दिग्दर्शक विश्वा यांचे व्हीजन क्लीअर होते, तर निर्माता म्हणून चित्रपटासाठी जे जे आवश्यक आहे ते ते देण्यासाठी स्वप्नील मराठे तत्पर असायचे. त्यामुळेच एक दर्जेदार कलाकृती ‘कढीपत्ता’च्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही रिद्धी कुमार म्हणाली.

भूषण पाटील आणि रिद्धी कुमार या नव्या कोऱ्या जोडीसोबत ‘कढीपत्ता’मध्ये संजय मोने, शुभांगी गोखले, अक्षय टंकसाळे, गार्गी फुले, गौरी सुखटणकर, सानिका काशीकर, निशा माने आदी कलाकार सहायक भूमिकांमध्ये, तर आनंद इंगळे, आनंदा कारेकर आणि चेतना भट पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, विनू सांगवान यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, अनन्या वाडकर, साज भट्ट, प्रियांशी श्रीवास्तवा यांच्या आवाजात स्वरसाज चढवला आहे. छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले असून वितरणाची जबाबदारी सिनेपोलीस सांभाळणार आहे. विशाल चव्हाण या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, संयुक्ता सुभाष प्रोजेक्ट हेड आहेत. पार्श्वसंगीत तन्मय भिडे यांनी, तर संकलन ऋषीराज जोशी यांनी केले आहे. रंगभूषा किरण सावंत यांनी केली असून, वेशभूषा पल्लवी पाटील आणि गार्गी पाटील यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!