शबनम न्यूज | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य शासन काम करत आहे. द्राक्ष उत्पादकांमुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने समृद्धी आली आहे. द्राक्ष बागाईतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनाचे व द्राक्ष परिसंवादाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, वाकड, पुणे येथे आयोजित कार्यक्रमास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शंकरराव मांडेकर, केंद्रीय फलोत्पादन उपसचिव संजय सिंह, कृषी आयुक्त हेमंत वसेकर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, पुणे एनआरसीजीचे संचालक कौशिक बॅनर्जी, चिली देशाचे द्राक्ष शास्त्रज्ञ कार्लोस फ्लोडी, संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, संघाचे खजिनदार शिवाजीराव पवार, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, द्राक्ष बागाईतदार संघाच्या अध्यक्षांनी मांडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेऊन त्यावर चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ. केंद्रीय स्तरावरील मागण्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन दिल्लीत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्यात येईल. मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून अडचण येणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील गरीबातल्या गरीब माणसाची प्रगती झाली पाहिजे यासाठी शासन काम करीत आहे. शेतकरी हीच आपली जात असून आपण शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जात आहोत. शेतकऱ्यांना समाधानी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना आणत असतो; पण त्यामुळे बाजारातील स्पर्धेकडे दुर्लक्ष होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.