spot_img
spot_img
spot_img

पैशांअभावी शिक्षण, सामाजिक कार्यात खंड पडू नये – जितेंद्र सिंह शंटी

दिशा परिवाराच्या वतीने २२५ गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“चांगले काम करणाऱ्या संस्‍थांना पाठबळ देण्याच्‍या उद्देशाने कंपन्यांकडून दोन टक्के सीएसआर निधीची तरतूद आहे. मात्र, मोठ्या कंपन्या स्‍वत:च मंदिर, ट्रस्‍ट, शाळा, सामाजिक संस्‍था सुरु करतात. त्‍यामध्ये सीएसआरचा निधी वळवितात. परिणामी गरजू संस्थांना पैशांची तूट भासते. पैशांअभावी कोणाचे शिक्षण किंवा चांगल्या सामाजिक कार्यात खंड पडू नये,” असे प्रतिपादन पद्मश्री जितेंद्र सिंह शंटी यांनी केले. जाती-धर्माच्या भिंती भेदून प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने सुरु असलेला दिशा परिवाराचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १९ वा शैक्षणिक शिष्यवृत्ती व दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात जितेंद्र सिंह शंटी बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात २२५ गरजू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्याच हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यंदाचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ‘दादाची शाळा’ या  उपक्रमाचे संस्थापक अभिजित पोखरणीकर यांना प्रदान करण्यात आला. मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी उद्योजक रावसाहेब घुगे, प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, दिशा परिवाराचे अध्यक्ष माणिकराव गोते, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, पौर्णिमा जानोरकर, मकरंद कुलकर्णी, नंदकिशोर रोजेकर, अरुण कुलकर्णी, चिन्‍मय कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी, विद्यार्थी, देणगीदार उपस्थित होते.

जितेंद्र सिंह शंटी म्हणाले, “देशसेवा व मानवतेसाठी चांगले कार्य करणाऱ्या संस्‍था पैशाअभावी बंद पडू नयेत. त्यांना मुबलक सीएसआर निधी उपलब्ध व्हावा, यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्‍याकडे पाठपुरावा सुरु आहे. गरजूपर्यंत हा निधी पोहोचावा. सामाजिक संस्‍थांना देगणी दिल्‍यानंतर गरजूपर्यंत पैसे पोहोचतो की नाही, अशी शंका असते. अशा स्थितीत दिशा परिवाराचे कार्य पारदर्शी पद्धतीने सुरु असून, ते कौतुकास पात्र आहेत.”

“कोरोना काळात जवळचे नातेवाईक सोबत येत नव्हते. कुठला नेता नाही, प्रशासन, हाॅस्पिटल सहकार्याला नाही. अशावेळी कोणताही जात-धर्म न पाहता चार हजार २६६ जणांवर मोफत अंत्‍यसंस्‍कार केले. आजवर ७० हजारांहून अधिक बेवारस मृतांचे अत्‍यंसस्‍कार केले. त्याची दखल घेत केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ज्‍याठिकाणी सरकारने काम करायला हवे, तिथे हा सरदार काम करीत होता, याचे समाधान आहे,” असे त्यांनी नमूद केले.

भाऊसाहेब जाधव म्‍हणाले, “हजारो विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम दिशा परिवाराने केले आहे. आज त्यातील अनेक मुले मिळालेल्या मदतीची परतफेड करण्याची संधी घेत आहेत. दिशा परिवारात दाते व मदत घेणारे गरजू विद्यार्थी हे सर्व जाती-धर्माचे आहेत. त्‍यामुळे इथे केवळ शिष्यवृत्तीच दिली जात नाही, तर समाजाला एकसंध ठेवण्याची भावना रुजवली जाते.”

रावसाहेब घुगे म्‍हणाले, “राज्‍य सरकारच्‍या प्रशाासन यंत्रणेत मोठे दोष आहेत. चूक नसताना आणि योग्य पद्धतीने काम करीत असतानाही यंत्रणेकडून सहकार्य मिळत नाही. समाजात ८० टक्‍के लोक चांगले आहेत. त्‍यांना एकत्र आणावे लागेल. त्‍यांच्‍या सहकार्यातून मोठी चळवळ पुढे येईल. त्‍यातून मोठी क्रांती करणे शक्‍य आहे. सीएसआरचा वचिंत मुलांच्‍या शिक्षणासाठी वापरला जावा.”

यावेळी पोखरणीकर यांनी पुरस्‍कारामुळे आणखी चांगले काम करण्याचा प्रेरणा मिळाली आणि यापुढे सामाजिक कार्य सुरुच ठेवणार असल्‍याचे सांगितले. दिशा परिवारामुळे जीवनाला दिशा मिळाल्‍याची भावना विद्यार्थ्यांनी व्‍यक्‍त केली. राजाभाऊ चव्हाण यांनी दिशा परिवाराच्या कार्याविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. बी. एल. स्‍वामी यांनी आभार मानले.

शिक्षण हेच खरे लंगर

लोक धर्मासाठी, स्वतःच्या नावासाठी जो खर्च करतात. त्यांनी तो शिक्षणासाठी द्यायला हवा. शिक्षण हेच खरे ’लंगर’ आहे. यामुळे मुलांची आयुष्य घडतात, अनेक परिवार चालतात. धर्माच्या नावाने कोणालाही प्रभावित करता येते, परंतु शिक्षण आणि सेवा याचे नाव काढल्यास लोक शंका घेतात. ही मानसिकता बदलायला हवी, असे जितेंद्र सिंह शंटी म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!