शबनम न्यूज | प्रतिनिधी
सागरा प्राण तळमळला… यांसारख्या देशभक्तीने परिपूर्ण काव्यरचना, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर कविता, बाबाराव, तात्याराव व येसूवहिनी यांच्यातील भावस्पर्शी संवाद अन त्यांची स्वगते यातून सावरकर व त्यांना मातृतुल्य असलेल्या येसूवहिनी यांच्यातील दीर-भावजयीचे पवित्र नाते, येसूबाईंच्या मनात सावरकरांबद्दलच्या तेजस्वी भावना उलगडताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित समिधा पुणे प्रस्तुत ‘मी…येसूवहिनी’ या हृद्य सांगीतिक अभिवाचन प्रयोगाचे! नवी पेठेतील निवारा सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि येसूवहिनी या दीर-भावजयीच्या पवित्र नात्याचे बंध उलगडणाऱ्या या कार्यक्रमाचा ६१ वा झाला. संगीता ठोसर यांचे हृदयस्पर्शी गीतगायन, डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांचे वास्तववादी संहिता लेखन, येसूबाईंच्या भूमिकेत वीणा गोखले, तात्याराव सावरकरांच्या भूमिकेत संजय गोखले व बाबाराव सावरकरांच्या भूमिकेत विनोद पावशे यांचे भावस्पर्शी अभिवाचन, तर दिलीप ठोसर यांचे ओघवते निवेदन यामुळे उपस्थितांचे मन भारावून गेले.
या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्ज्वल्य देशभक्तीबद्दल असंख्यांच्या, अगणितांच्या मनांत आदर, अभिमान आणि निष्ठा आहे. मात्र खुद्द सावरकरांना कोणाबद्दल आदर वाटत होता, त्यांचे स्फूर्ती स्थान कोणते, आणि तेच का या प्रश्नांची उत्तरे जसजशी प्रेक्षकांना मिळत गेली, तसे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सावरकरांचा जाज्वल्य इतिहास ऐकताना प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या.
सावरकरांनी परदेशातून गुप्तपणे क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे व साहित्य पुरवण्याचे काम केले. इंग्लंडमधून भारतात परतताना त्यांना अटक झाली. परंतु मार्सेल (फ्रान्स) येथे जहाजातून पळ काढण्याचा त्यांचा धाडसी प्रयत्न आजही इतिहासातील संस्मरणीय घटना मानली जाते. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये १० पेक्षा जास्त वर्षे अमानुष छळ सोसला, तरीही ते मानसिकदृष्ट्या खचले नाहीत. जेलमध्ये असतानाही त्यांनी सहकार्यांना प्रेरित केले, कविता लिहिल्या आणि इतिहास, संस्कृती व राष्ट्रवादावर अभ्यासपूर्ण लेखन केले. आजही सावरकरांचे कार्य फक्त क्रांतिकारी म्हणूनच नव्हे, तर विचारवंत, समाजसुधारक आणि साहित्यिक म्हणूनही स्मरणात ठेवले जाते. त्यांच्या बालपणातील देशभक्तीची ठिणगी अखेर प्रखर ज्योत बनून स्वातंत्र्याच्या लढ्यात भारताला दिशा देणारी ठरली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश गोगावले, देणगीगार राजश्री पुजाधिकारी, ले. कर्नल भार्गव, वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह व संचालिका मीना कुर्लेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ, मीनाक्षी नवले, तेजस्विनी थिटे, जाणीव संघटनेचे संजय शंके, डॉ. श्रीकांत गबाले आदी उपस्थित होते.