पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रियंका प्रवीण बारसे यांना संकल्प महिला हक्क परिषद व महिला सन्मान सोहळा 2025 ,महिला गौरव कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय हिरकणी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ. प्रियंका प्रवीण बारसे या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात यशस्वीपणे वाटचालीसाठी तसेच समाजमूल्य जपून घटनेच्या चौकटीत, कधी रचनात्मक कधी संघर्षात्मक पद्धतीने महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न करत असतात . त्यांच्या प्रभावी संवेदनशील समाजभिमुख प्रेरणेमुळे रणरागिनींसाठी संकलित प्रेरणा महिला वर्गाला मिळत असते. त्यांचे हे कार्य असेच सर्व समावेशक कृतीतून निरंतर चालत राहावे याकरिता महिला गौरव कृती निवड समिती यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांना राज्यस्तरीय हिरकणी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रीयन फेटा, शाल, श्रीफळ ,मानपत्र, ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच संकल्प महिला हक्क परिषदेचे अध्यक्ष मीनाक्षीताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार मिळाल्यानंतर सौ प्रियंका प्रवीण बारसे यांनी संकल्प महिला हक्क परिषदेचे अध्यक्ष मीनाक्षीताई पाटील तसेच संयोजक पी. एस. कदम व निवड समितीचे त्यांनी आभार व्यक्त केले. या सोहळ्यास त्यांचे सर्व मित्र परिवार, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर व कुटुंब सदस्य उपस्थित राहिल्याने आपणास आनंद झाल्याची भावना यावेळी प्रियंका ताई बारसे यांनी व्यक्त केली.