पुणे, २३ ऑगस्ट २०२५ :वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशनच्या कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, पुणवळे येथे शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय अवकाश दिन भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अॅस्ट्रोएड्यु (संस्थापक डॉ. लीना बोकील) आणि तारे जमीन पर ट्रस्ट, बेंगळुरू (संस्थापक श्री. दिनेश बडगंडी) यांच्या संयुक्त विद्यमाने व वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल डोम प्रोजेक्शन शो व डिजिटल प्लॅनेटोरियम, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना चांद्रयान ते आगामी गगनयान या भारताच्या अवकाश प्रवासाचा अनुभव घेता येईल. यासोबतच संवादात्मक शैक्षणिक सत्रे व तज्ज्ञांशी थेट संवाद आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमास माननीय श्री. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री),
डॉ.भारतभूषण जोशी (माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ, DRDO),
श्री.किरण ठाकूर (संस्थापक अध्यक्ष, तरुण भारत व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच डॉ.लीना बोकील (नासा स्पेस एज्युकेटर), श्री.प्रणव प्रसून (उडान फेडरल एव्हिएशन), श्री.अभिजित चौधरी (तारे जमीन पर ट्रस्ट) हे विशेष निमंत्रित म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यवस्थापकीय अधिकारी व माध्यम प्रतिनिधींसह ४०० हून अधिक जण सहभागी होणार असून शाळेचा परिसर अवकाश विज्ञानाने उजळून निघणार आहे.