spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या काळेवाडीतील ‘मोफत महाआरोग्य शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त काळेवाडी येथील न्यू जिजामाता रुग्णालयातर्फे ‘मोफत महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरामध्ये २०० हून अधिक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला.

महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उदघाटन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले. याप्रसंगी डॉ. अलवी नासेर, डॉ. शीतल शिंदे, डॉ. जतीन होतवानी, बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती विसपुते व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया पाटील, सामाजिक कार्यकर्त्या संगीता कोकणे, अनिता पांचाळ तसेच जिजामाता रुग्णालय व काळेवाडी दवाखान्याचे कर्मचारीही उपस्थित होते.

या शिबिरात नागरिकांसाठी वजन, उंची, शरीर वस्तुमान निर्देशांक (बीएमआय), सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, नियमित लसीकरण, छातीचा क्ष-किरण, थुंकी तपासणी, गरोदर मातांची तपासणी तसेच ‘आभा’ व ‘आयुष्मान’ कार्ड नोंदणी या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय नागरिकांना बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी (फिजीशियन) यांचे मार्गदर्शन मिळाले. तपासणीनंतर सर्व प्रकारची औषधे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आली.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने नागरी आरोग्य पोषण दिनाच्या अनुषंगाने शहरातील विविध भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दारी आरोग्यसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. काळेवाडीत झालेल्या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे या उपक्रमाच्या यशाचे प्रतीक आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या अशा आरोग्य शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

मोफत महाआरोग्य शिबिरांमुळे नागरिकांना विविध तपासण्या व उपचार एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. या उपक्रमामुळे आजाराचे लवकर निदान होऊन योग्य उपचार शक्य होत आहेत. शिबिरात तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला आवश्यक औषधे मोफत देण्यात येत आहेत.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!