spot_img
spot_img
spot_img

पुण्यात विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, मुख्य अभियंता रिनाज पठाण आदी उपस्थित होते.

महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्पाबाबत माहिती दिली.पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित २७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा, म्हणून या दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.

या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध -शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!