spot_img
spot_img
spot_img

नव्या काळातील बदल स्विकारणारी पीढी एमकेसीएलने घडवावी – मुख्यमंत्री

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्विकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एमकेसीएलच्या नाविन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमात आपली भूमिका अदा करण्यासाठी राज्य शासन अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, एमकेसीएलचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, संस्थापक पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ. विवेक सावंत, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आज कृत्रिम बुद्धीमत्तेचे मोठे आव्हान आपल्यासमोर असतांना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा भाग झाला आहे. या परिस्थितीत नवी मूल्ये आणि आव्हाने ओळखून पुढे जावे लागेल. क्वांटम कम्युटींग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सेमीकॉन या तीन क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपीटल आहे. देशातील ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्राकडे आहे, या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रयत्न एमकेसीएलने करायला हवे. राज्य शासन त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करेल.

माहिती तंत्रज्ञान लाटेप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळातही आपल्याला पुढे रहावे लागेल. रोजगाराचे स्वरुप बदलत असतांना नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभी केली तर राज्य सरकार त्याला निश्चितपणे सहकार्य करेल. एमकेसीएलचे विविध उपक्रम समाजासाठी आणि शासनासाठी उपयुक्त ठरले आहेत. एमकेसीएलने विकसीत केलेल्या नव्या संकेतस्थळावर ५० हजार पुस्तके वाचता येणार आहे. एमकेसीएलच्या विविध प्रकल्पामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासोबत कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षात उत्तम प्रकारचे बदल एमकेसीएलने घडवून आणले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुठल्याही समाजजीवनात नेहमी आव्हाने येत असतात आणि त्यांना उत्तरे शोधणाऱ्या व्यक्ती-संस्था उभ्या राहतात. जगात इंटरनेटची लाट आली असतांना डिजीटल विषमतेसंदर्भातील समाजजीवनापुढच्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासोबत ते सर्वांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था उभी करण्याचे कार्य महाराष्ट्र ज्ञान मंडळाने केले. समाजातील एक विशिष्ट वर्गाला पुढे आणण्यासाठी केवळ लाभाचा विचार न करता दीर्घकालीन लाभ लक्षात घेऊन एमकेसीएलने जबाबदारीने उत्तम प्रकारचे कार्य केले. राज्यात साडेसहा हजार उद्योजकांचे जाळे आणि कोणत्याही क्षणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था या माध्यमातून उभी राहीली. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण या व्यवस्थेत आणू शकलो, अशा शब्दात फडणवीस यांनी एमकेसीएलच्या कार्याचे कौतुक केले.

राज्यातील जनतेचे जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात एमकेसीएलने महत्वाची भूमिका अदा करावी- अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने गेल्या २५ वर्षात जगभरात अखंड ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे कार्य एमकेसीएलने केले. संस्थेने संगणक साक्षरतेपासून सुरूवात करून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत संगणकीय तंत्रज्ञान पोहोचविले. डिजीटल युगात ग्रामीण भागात नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य संस्थेने केले. जगात कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे विविध क्षेत्रात वेगाने बदल घडत असतांना बदलत्या तंत्रज्ञान युगासाठी तरुण पिढीला सक्षम बनविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे एमकेसीएल आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तंत्रज्ञान संशोधन संस्था उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञान युगात राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याची गरज आहे. आपल्या लोकसंख्येचे रुपांतर मानवी भांडवलात केले तरच देशाला प्रगती करता येईल. ज्ञान, कौशल्य, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याची गरज आहे. एमकेसीएलने यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजीटल उत्पादने, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजाभिमुख उपक्रम आणण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्थेने या संदर्भात शासनाला उपयुक्त सूचना कराव्यात, त्यासाठी सर्व सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल.

आगामी काळ कृत्रिम बुद्धीमत्तेचा असल्याने शासनाने कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता शहर स्थापित करण्यात येणार आहे. नव्या पिढीला उत्तम शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी पाच परदेशी नामवंत विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एमकेसीएलने अधिक व्यापक दृष्टीकोन ठेवून कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे जीवन सुलभ, समृद्ध आणि ज्ञानसमृद्ध करण्यात महत्वाची भूमिका अदा करावी, असे आवाहन त्यांनी केले. एमकेसीएल प्रत्येक जबाबदारीला न्याय देईल आणि महाराष्ट्राच्या ज्ञानयात्रेतील डिजीटल प्रगतीत महत्वाचा दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!