शबनम न्यूज | प्रतिनिधी
पर्णकुटी संस्थेच्या सहकार्याने कोंगा सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे गरजू महिलांना अर्थसहाय्य व स्वयंरोजगारासाठी साहित्याचे वाटप करण्यात आले. कोंगा सॉफ्टवेअरतर्फे या उपक्रमाअंतर्गत १० महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिझनेस किट्स प्रदान करण्यात आले. यामध्ये तीन महिलांना शिवणकाम मशीन, चार महिलांना ऍडव्हान्स ब्युटी पार्लर किट्स व तीन महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी निधी देण्यात आला. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून स्वयंरोजगार व कौशल्य विकास उपक्रमांतर्गत नुकताच हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमासाठी अभिनेत्री व अस्मिता महाराष्ट्राची संस्थेच्या संचालक अंकिता शिवतारे, पर्णकुटीच्या सहसंस्थापक स्नेहा भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते महिलांना शिवणकाम मशीन, ऍडव्हान्स ब्युटी पार्लर किट्स व ३२५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीसाठी महिलांनी कोंगा सॉफ्टवेअर व पर्णकुटी संस्थेचे आभार मानले. अंकिता शिवतारे यांनी आपल्या भाषणातून महिलांनी आर्थिक स्वावलंबी असण्याचे फायदे, महिला सबलीकरणासाठी शिक्षण व कौशल्याचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. पूर्वा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शलाका कोकणे आणि पर्णकुटीमधील सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.
स्नेहा भारती म्हणाल्या, “पूर्णकुटी अनेक वर्षांपासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यरत आहे. कोंगा सॉफ्टवेअरच्या सहकार्याने हे काम पुढे नेता आले. असेच सहकार्य मिळत राहिले, तर आमच्या कार्याला अधिक गती मिळेल. महिला, बालके आणि समुदाय विकासाच्या क्षेत्रात पर्णकुटी सक्रिय आहे. महाराष्ट्र आणि बिहारमधील वंचित समुदायामधील मुले, अल्प उत्पन्न गटातील महिला, ट्रान्सजेन्डर, एचआयव्ही बाधित, देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यामध्ये शिक्षण, कौशल्य विकास,जागृती, आरोग्य आणि पोषण, तसेच समुपदेशन यांवर भर दिला जातो. संस्थेचे उद्दिष्ट शाश्वत विकासाची परिसंस्था निर्माण करणे आणि समुदायामध्ये आर्थिक वाढ घडवून आणणे आहे.”