शबनम न्यूज | प्रतिनिधी
“शासन यंत्रणा दुर्बल झाल्यानेच स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) निर्मिती झाली. शासन, प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणजे या स्वयंसेवी संस्था आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून मोठे सामाजिक कार्य उभे राहते. समाज सक्षम होण्यात स्वयंसेवी संस्था मोलाचे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन आदर्श ग्राम योजनेचे अध्यक्ष, पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. सामाजिक क्षेत्र वृद्धिंगत व्हायचे असेल, तर स्वयंसेवी संस्था टिकायला हव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र एनजीओ समितीच्या वतीने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंचमध्ये आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पोपटराव पवार बोलत होते. प्रसंगी महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे, उपाध्यक्षा सारिका आटोळे, महा सीएसआर डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोरे, हार्टफुल इन्स्टिट्यूटच्या महाराष्ट्र व गोवा राज्य समन्वयक डॉ. अंजली बापट, विभागीय समन्वयक डॉ. विकास देव, एमआयटी राष्ट्रीय सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. योगेश पाटील, उद्योजक विक्रम उगले, महाराष्ट्र पर्यावरण समन्वय समितीचे सल्लागार संजय भोसले, महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य संपर्कप्रमुख संदीप बोटे, पूजा खडसे, शीतल उगले अश्विनी कसबे, सुरेखा भुसे, शितल पाटील, सपना श्रीवास्तव, कृष्णात पोवार, रवीसागर हाळवणकर, संजना चेंडे आदी उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले, “अध्यात्म मानवतावाद शिकवतो. मात्र अध्यात्मिक चळवळी पैशांभोवती गुरफटल्याने संस्कारमूल्यांचे हनन होत आहे. नीतिमूल्यांचा अभाव आहे. अशावेळी सामाजिक अधःपतन होते. हे थांबवायचे असेल, तर आपल्याला भारत आणि इंडिया यामधील फरक समजून घेऊन भारताला सक्षम करण्याचे काम करावे लागेल. आपल्या हाती आलेल्या पैशांचा विनियोग योग्य पद्धतीने करावा लागेल. त्यासाठी सामाजिक संस्थांची आशावादी चळवळ अधिक व्यापक करायला हवी. सीएसआर मधून येणाऱ्या निधीचा उपयोग कटाक्षाने सर्वसामान्यांच्या हितासाठी केला जावा. निसर्ग संवर्धन, तापमान बदल, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांत भरीव काम करता येते. स्वयंसेवी संस्थांनी शहरी भागासह ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवण्यावर अधिक भर द्यावा.”
डॉ. युवराज येडूरे म्हणाले, “या अधिवेशनात महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. विविध समस्या, त्यावरील उपाय व विकास आणि सामाजिक उपक्रमांसाठी मिळणारा शासनाचा, तसेच व कंपनीच्या सीएसआर निधीचा उपयोग कसा करून घेता येईल, यावर विस्तृत चर्चा झाली. धर्मादाय आयुक्त, प्राप्तिकर विभाग, सीएसआर, सामाजिक समस्या यासंबंधी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. अनेक वर्षापासून प्रलंबित सामाजिक समस्यांवर चर्चा आणि उपाययोजना, स्वयंसेवी संस्थांच्या कामाचे व्याप्ती व त्यांचे महत्त्व आणि समाजावर होणारे परिणाम, अधुनिक जीवनशैली विकास कामांमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका, नवीन तंत्रज्ञान आणि संधी, तसेच सामाजिक क्षेत्राचे हक्काचे महामंडळ होण्यासाठी ठराव पारित करण्यात आला.
दुपारच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात स्वयंसेवी संस्थांच्या विविध शंकांचे निरसन डॉ. युवराज येडुरे व अन्य तज्ज्ञांनी केले. संदीप बोटे यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा कोहळे व विशाल कुमावत यांनी सूत्रसंचालन केले. सारिका आटोळे यांनी आभार मानले.