शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. इतिहास, संस्कृती आणि शिक्षण यांचा संगम साधत, या विद्यालयाने राष्ट्रप्रेमाचा एक अनोखा आदर्श उपस्थितांसमोर ठेवला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी देशभक्तीच्या भावना जागृत केल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली भक्तिगीते, देशभक्तिपर नाटिका व नृत्य यांनी कार्यक्रमात रंगत आणली.या प्रसंगी नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार अमित गोरखे, संचालक विलास जेऊरकर, विद्यालय व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर आणि मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे शाळेचे दोन माजी विद्यार्थी – अरबाज कलावंत आणि वैभव चव्हाण – यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. शिक्षणाच्या जोरावर त्यांनी गाठलेली यशस्वी शिखरे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरली.
आमदार अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना उद्देशून केलेल्या भाषणात स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून देत, नव्या पिढीकडून सामाजिक योगदानाची अपेक्षा व्यक्त केली. तसेच, स्टुडन्ट कौन्सिल सदस्यांची औपचारिक निवडही याच दिवशी पार पडली.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. संतोष कसबे यांनी उपस्थित राहून ‘अमली पदार्थांपासून मुक्त समाज’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या मनोवेधक भाषणाने उपस्थितांमध्ये सामाजिक भान निर्माण केले.या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नॉव्हेल इंटरनॅशनल विद्यालयाचा हा उपक्रम केवळ एक सोहळा नसून, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जाणीवेचा दीप उजळवणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला.