spot_img
spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्याबद्दल मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार मानले. या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडू राज्यातील एका किल्ल्याचा समावेश आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच पर्यटन, स्थानिक रोजगार आणि सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.


यावेळी केंद्रीय आयुषमंत्री प्रताप जाधव, शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रविंद्र वायकर, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा उपस्थित होते. शिवसेनेच्या खासदारांनी पगडी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन पंतप्रधान मोदी यांचा सन्मान केला. पत्र देऊन आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान राजा, रणनीतिकार आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे अनुभव आणि त्यांच्या आईच्या शिक्षणामुळे त्यांना एक कुशल योद्धा आणि कार्यक्षम प्रशासक बनण्यास मदत झाली. १६७४ मध्ये त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची पायाभरणी केली आणि “छत्रपती” ही पदवी धारण केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच १६४५ मध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य मोहीम सुरू केली. त्यांची मोहीम केवळ किल्ले जिंकणे किंवा युद्धे लढणे एवढी मर्यादित नव्हती, तर त्याचे उद्दिष्ट स्वतंत्र, न्याय्य आणि स्वावलंबी राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्थापन करणे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अत्यंत कार्यक्षम आणि न्याय्य शासन व्यवस्था स्थापन केली, जी जनकल्याणावर आधारित होती. त्यांनी शत्रूंना अनेक वेळा पराभूत करणारी लष्करी रणनीती विकसित केली. छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ल्यांचे महत्त्व समजले आणि त्यांना त्यांच्या रणनीतीचा अविभाज्य भाग बनवले. त्यांनी ३०० हून अधिक किल्ले बांधले आणि त्यांचे नूतनीकरण केले, जे केवळ निवासस्थानासाठीच नव्हे तर लष्करी मुख्यालय, शस्त्रागार आणि खजिना म्हणून देखील वापरले जात होते. त्यांनी प्रत्येक किल्ला प्रशासकीय आणि लष्करी केंद्र म्हणून स्थापित केला. त्यांचे योगदान केवळ किल्ल्यांच्या बांधकामापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी त्यांना एक मजबूत सुरक्षा यंत्रणा म्हणून विकसित केले. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे किल्ले केवळ मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक नाहीत. तर लष्करी स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. याशिवाय, तामिळनाडूतील जिंजी किल्ला देखील या यादीत समाविष्ट आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील समृद्ध मराठा वारसा अधोरेखित होईल. ज्यामुळे राज्यातील लोकांचा त्यांच्या इतिहासाबद्दल अभिमान आणि जागरूकता वाढेल. हे किल्ले इतिहासाचे विद्यार्थी आणि संशोधकांसाठी महत्त्वाचे अभ्यासस्थळ बनतील, ज्यामुळे शैक्षणिक पर्यटनालाही चालना मिळेल. या उपक्रमामुळे या किल्ल्यांच्या संवर्धन, जीर्णोद्धार आणि देखभालीला प्रोत्साहन मिळेल, जेणेकरून या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व दीर्घकाळ टिकून राहील. हे किल्ले जागतिक नकाशावर आल्यामुळे, जगभरातील पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची प्रेरणा मिळेल, ज्यामुळे महाराष्ट्र राज्य पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र बनून देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत राहील, असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!