आपत्कालीन प्रसंगी जलद व शिस्तबद्ध प्रतिसादासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक विभागात नव्याने नियुक्त झालेल्या अग्निशामक जवानांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यापक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश नवोदित जवानांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि उपकरणांची ओळख करून देणे, आपत्कालीन परिस्थितीत शिस्तबद्ध आणि जलद प्रतिसाद देण्याचे कौशल्य विकसित करणे, तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे उपकरणांचा परिणामकारक वापर शिकवणे हा होता.
या प्रशिक्षण सत्रादरम्यान जवानांना फायर होजचा योग्य वापर व त्यासंबंधित तांत्रिक माहिती, पाणी व फोम टेंडरची सुरक्षित आणि कार्यक्षम हाताळणी, विविध प्रकारच्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रांचा वापर, संघभावना, नेतृत्वगुण आणि आपत्कालीन निर्णयक्षमता यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
यासोबतच अत्याधुनिक अग्निशमन साधनांच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून त्यांच्या कार्यपद्धती व वापराबाबत जवानांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा दाब आणि प्रमाण नियंत्रित करण्यासाठी सिलेक्टेबल गॅलॉन नोझल, झटपट दाब नियंत्रित करण्यासाठी सिलेक्टेबल गॅलॉन ट्रिगर कंट्रोल नोझल, कमी दाबातही कार्यक्षमतेने पाणी फवारण्यासाठी सिलेक्टेबल गॅलॉन फोर्स लो प्रेशर नोझल, विविध प्रकारच्या आगींवर कार्य करण्यासाठी मल्टिपर्पज नोझल, फोम तयार करून रासायनिक वा द्रव पदार्थांच्या आगी विझविण्यासाठी सेल्फ-एड्युसिंग सिलेक्टेबल गॅलॉन नोझल, जास्त उष्णता असलेल्या जागी पाण्याची धुकी करून वातावरण थंड ठेवण्यासाठी व आग नियंत्रित करण्यासाठी मल्टिपर्पज थ्री-डी वॉटर मिस्ट, भिंत वा अडथळा फोडून आतील भागातील आग विझवण्यासाठी पिअरसिंग अप्लिकेशन नोझल, उच्च दाबाने पाणी सोडून मोठ्या प्रमाणावर आग आटोक्यात आणण्यासाठी हाय-प्रेशर डिस्चार्ज नोझल, जमिनीवरूनच दूर असलेली आग विझवण्यास मदत करणारे पोर्टेबल ऑसिलेटिंग मॉनिटर, अडकलेले दरवाजे, खिडक्या वा अडथळे फोडण्यासाठी इम्पॅक्ट टूल सेट, जवानांचे संरक्षण करण्यासाठी हॉलीगन टूल, तसेच कट अँड इम्पॅक्ट रेसिस्टन्स ग्लोव्ह्स इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले.
नवीन भरती झालेल्या जवानांनी या प्रशिक्षण सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. जवानांनी प्रत्यक्ष अनुभवातून मौल्यवान ज्ञान आत्मसात केल्याचे सांगितले. विशेषतः आधुनिक नोजल्स, रिमोट कंट्रोल मॉनिटर आणि रेस्क्यू टूल्सच्या प्रात्यक्षिकांचा अनुभव फार उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिका नेहमीच आपत्ती व्यवस्थापनाला सर्वाधिक प्राधान्य देते. केवळ आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे पुरेसे नाही, तर त्याच्या प्रभावी वापरासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण हे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने आयोजित हे प्रशिक्षण सत्र म्हणजे भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी घेतलेले धोरणात्मक पाऊल आहे. अशा उपक्रमांमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत महापालिकेची बांधिलकी अधिक बळकट होते.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
अग्निशमन कार्य हे केवळ धैर्याचे नव्हे, तर तांत्रिक ज्ञान, उपकरणांचे योग्य प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध कृतीचे कार्य आहे. जवानांना दिलेल्या प्रशिक्षणाने आधुनिक साधनसामग्रीची सखोल ओळख करून दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांतून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक उपकरणांच्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या वापराबाबतचा चांगला अनुभव मिळाला.
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
आग विझवण्याबरोबरच जीव वाचवणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. यासाठी केवळ शारीरिक क्षमता नव्हे, तर मानसिक ताकद, तांत्रिक तयारी आणि परिस्थितीजन्य निर्णयक्षमता तितकीच महत्त्वाची आहे. या प्रशिक्षणादरम्यान आपत्तीच्या प्रसंगी स्वतःची आणि सहकाऱ्यांची सुरक्षा व बचाव कसा करावा, तसेच साधनसामग्री योग्य वेळी व योग्य पद्धतीने कशी वापरावी याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
– ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका