spot_img
spot_img
spot_img

जीवनात यशस्वी होण्यासाठी कल्पक, ध्येयवादी रहावे – डॉ. भावेश भाटिया

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“जीवनात यशस्वी होण्यासाठी कल्पक, ध्येयवादी व प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. आयुष्यात यश साध्य करायचे असेल, तर फक्त स्वप्न पाहू नका; ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत राहा,” असा सल्ला सनराईज कँडल्स अँड ओशोनिक व्हिजन फॉर ब्लाइंड वेलफेयर सोसायटीचे संस्थापक डॉ. भावेश भाटिया यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. भावेश भाटिया प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समितीच्या मुलींचे नवीन वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमावेळी भाटिया यांची पत्नी नीता, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, पद्माकर जोगदंड, दिनकर वैद्य, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओंकार शिंदे, मानसी जाधव यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले. डॉ. आपटे वसतिगृहात कर्नल दीनानाथ सिंग, सुमित्रा सदनमध्ये विनया ठोंबरे, लजपत भवनमध्ये श्रीधर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

कार्यक्रमाची सुरवात देशभक्तीपर गीते आणि ऑपरेशन सिंदूर वरील ऍक्ट सादर करून झाली. संघर्षपूर्ण वाटचाल करत यशस्वी उद्योजक बनलेल्या दृष्टीहीन डॉ. भावेश भाटिया यांनी आपला प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यशस्वी उद्योजकासोबतच गिर्यारोहक, क्रीडापटू, सायकलपटू अशी भाटिया यांची उल्लेखनीय कामगिरी ऐकून उपस्थित प्रभावित झाले. या प्रवासात पत्नी नीता हिची मोलाची साथ लाभल्याचे सांगून समिती आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे, तेही एक प्रकारे देशसेवेचेच कार्य आहे, अशा शब्दांत समितीच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. भाटिया म्हणाले, “घरची परिस्थिती बिकट असताना, आईच्या आजारपणात नातेवाईकांची साथ लाभली नाही. अशावेळी महाबळेश्वर येथे मसाजचा व्यवसाय करत यशस्वी होण्याचे ध्येय उराशी बाळगून ५००० रु पासून सनराईज मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. कोणतीही वस्तू बनवण्यापेक्षा ती विकणे कठीण असते. मात्र, नफ्याचा विचार न करता ग्राहकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करत व्यवसाय केला. हा व्यवसाय करताना माणसे जोडली. रेल्वे प्लॅटफॉर्म, बस स्टॅन्डवर अनेक दिव्यांग, दृष्टिहीन बांधव भीक मागण्याचे काम करतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून  दृष्टीहीन, तसेच दिव्यांगांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही भाटिया यांनी नमूद केले.

तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली. समिती हे युवा परिवर्तनाचे केंद्र बनले असून, विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याचा दृष्टीने काम केले जात आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. यावेळी समितीचे हितचिंतक असलेल्या पद्माकर जावडेकर यांच्या परिवाराकडून दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समितीतील विद्यार्थ्यांनी देणगी स्वरूपात काही रक्कम गोळा करून ती डॉ. भाटिया यांच्या संस्थेला दिली. ओंकार शिंदे व पर्णवी म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. सानिका खामणकर हिने आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!