spot_img
spot_img
spot_img

पीसीयू आयोजित मराठी उद्योजकांच्या जागतिक परिषदेचे दुबई येथे उद्धघाटन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचे शतक साजरे होत असताना २०४७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सहा दश लक्ष डॉलरचा टप्पा पार करेल. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व्यवसाय उभारणार्‍या भारतीय आणि मराठी उद्योजकांचे योगदान उल्लेखनीय असेल असा विश्वास भारत आणि दुबई संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन यांनी व्यक्त केला.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) च्या वतीने दुबई येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन सत्रात पीसीयूचे कुलपती व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, अल अली ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी संचालक दुबईचे एच. ई. याकुब अल अली, जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रतापराव पवार, जेष्ठ लेखक संदीप वासलेकर, गर्जे मराठीचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, महाराष्‍ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कार्यक्रमाचे संयोजक सचिन इटकर आदींसह देश विदेशातील विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक उपस्थित होते.
   पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, दुबई हे जागतिक उद्योग क्षेत्राचे प्रवेशद्वार असून या संधीचा मराठी उद्योजकांना योग्य उपयोग व्हावा या उद्देशाने ही परिषद आयोजित केली आहे. यामध्ये व्यापार, उद्योग क्षेत्रातील उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत. परदेशातील नोकऱ्यांबरोबरच आता जागतिक उद्योगविश्वातही मराठी माणसाचे पाउल पुढे पडावे, मराठी उद्योजकाला व्यवसायासाठी जगभरात संधी उपलब्ध करून देण्यासाठी जगातील मराठी उद्योजक एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करावे या संकल्पनेतून “ग्लोबल इंटरपीनर दुबई २०२५” या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नवउद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
     माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले की, मराठी उद्योजकांनी नव्या संधी निर्माण होण्यासाठी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
   दुबईतील प्रसिद्ध उद्योजक व अल अली समूहाचे एच. इ. याकुब अल अली यांनी सांगितले की, भारतीयांनी दुबईत आपला व्यवसाय वाढवावा. आम्ही त्यांचे सदैव स्वागत करू आणि पूर्ण सहकार्य करण्यास उत्सुक आहोत.
     जेष्ठ उद्योजक प्रतापराव पवार म्हणाले की, मराठी उद्योजकांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेतली आहे, परंतु  त्याला योग्य व्यवहाराची जोड देणे गरजेचे आहे.
    स्वामी ब्रह्मविहारी यांनी उद्योजकांना व्यवसायाबरोबर नैतिकता गरजेची आहे असे सांगितले.
   महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी महाराष्ट्र राज्य उद्योगांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन पाठीशी कायम उभे राहील असा विश्वास व्यक्त केला .
   प्रास्ताविक संयोजक व महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे उपाध्यक्ष सचिन इटकर यांनी केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक यांचे स्वागत गर्जे मराठी चे आंनद गाणू, आभार डॉ. गिरीश देसाई यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!